पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
परिसरातील गजानन चौक येथील कोमटी गल्लीत सोमवार (दि. १३) रोजी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. दुचाकीवर (Bike) आलेल्या दोन संशयितांनी एका युवकावर (Youth) धारदार शस्त्राने हल्ला केला. परंतु, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परतेने हटकले, त्यामुळे युवकाचा प्रसंगावधानाने बचाव झाला.
या हल्ल्यात युवकाला किरकोळ दुखापत झाली असून गंभीर इजा झालेली नाही. संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि काही नागरिकांच्या मोबाईलमध्ये (Mobile) कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच मोबाईल फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक युवक पळत कोमटी गल्लीत शिरला होता. त्याचा पाठलाग करत दोन संशयित दुचाकीवरून आले. या दरम्यान त्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या दोन मुलींना आणि एका शाळेच्या व्हॅनला धडक दिली. पुढे त्या युवकाला गाठून त्यातील एकाने धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर वार केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता.
दरम्यान, यावेळी काही नागरिकांनी (Citizen) धैर्य दाखवत हल्लेखोरांना हटकले, त्यानंतर दोघेही शिवीगाळ करत गुरुद्वाराकडील रस्त्याने पसार झाले. नागरिकांनी तत्परता दाखवली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांनी हल्ल्याच्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.




