Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik District Nagarparishad Election Result 2025 : आज मतमोजणी; कोण होणार नगराचा...

Nashik District Nagarparishad Election Result 2025 : आज मतमोजणी; कोण होणार नगराचा कारभारी?

नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी हजाराहून अधिक उमेदवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election Result) दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे राजकीय भविष्य आज (दि. २१) होत असलेल्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात विजय पडतो आणि ‘कोण नगराचा बादशहा होतो?’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

येवला, नांदगाव, भगूर येथे थेट लढत होत असून या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. नगराध्यक्षपदासाठी चांदवडमध्ये सर्वाधिक दहा, त्र्यंबकेश्वर व मनमाडमध्ये प्रत्येकी आठ, ओझरमध्ये सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सिन्नर व इगतपुरीत चौरंगी, सटाणा व पिंपळगावमध्ये तिरंगी तर नांदगाव, भगूर व येवल्यात थेट लढत होत आहे.

YouTube video player

पिंपळगावमध्ये वर्चस्व पणाला

पिंपळगाव बसवंतमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) यांची युती असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व काँग्रेसने आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार असून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर, भास्करराव बनकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम व काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे यांचे वर्चस्व पणाला लागले आहे.

नगराध्यक्षपद (अनुसूचित जमाती), शरद गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), डॉ. मनोज बर्डे (भाजप), संतोष गांगुर्डे (काँग्रेस)

नांदगावी विकासाविरुद्ध परिवर्तनाची लढाई

नांदगावचे नगराध्यक्षपद आपल्याकडे राखण्यासाठी आमदार सुहास कादे यांनी ही लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजप व रिपाइंची त्यांना साथ लाभली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून माजी नगराध्यक्ष बनकर यांना पुन्हा संधी देण्यासाठी मतदारांना साकडे घातले आहे. विकासाविरुद्ध परिवर्तनाची लढाई या ठिकाणी रंगली असून कोणाला साथ मिळते याकडे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षपद (सर्वसाधारण), सागर हिरे (भाजप), राजेश बनकर (राष्ट्रवादी, काँग्रेस अजित पवार)

येवल्यात मंत्री विरुद्ध आमदार लढत

येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे) यांच्यात सरळ सामना होत असून खरी लढाई ही मंत्री छगन भुजबळ आणि आजी-माजी आमदार दराडे बंधूमधील वर्चस्वाची आहे. या निवडणुकीत मंत्री भुजबळ यांच्या अनुपस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ व कुटुंबीयांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता आहे.

नगराध्यक्षपद (ओबीसी), राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रूपेश दराडे शिवसेना (शिंदे)

भगूरमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा

भगूरमध्ये शिवसेना (शिंदे) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप अशी लक्षवेधी लढत रंगली आहे. विजय करंजकर यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीनही पक्षांनी मोट बांधत परिवर्तनाची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात स्थानिक विरुद्ध परका अशी लढत येथे रंगली.

नगराध्यक्षपद (महिला), अनिता करंजकर शिवसेना (शिंदे), प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार).

चांदवडला भाजपसमोर आव्हान

चांदवड नगराध्यक्षपदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत असून चार प्रमुख पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नगरपरिषदेवर भाजपची सत्ता होती, ती कायम ठेवण्यासाठी त्यांच्याकडून केलेल्या कामांच्या बळावर मतदारांना साकडे घालण्यात आले. तर विरोधी दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना (उबाठा) कडून त्यांना रोखण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले आहेत. दहा उमेदवारांमुळे होणारी मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडते यावरच विजयाची गणिते अवलंबून आहेत.

नगराध्यक्षपद (सर्वसाधारण), वैभव बागुल (भाजप), सुनील बागुल (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), विकी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), शंभुराजे खैरे (शिवसेना उबाठा), राकेश अहिरे, राजाभाऊ आहिरे, जयेश पारवे, गोपी बडोदे, रूपेश बागुल, अशोक हिरे (सर्व अपक्ष

त्र्यंबकमध्ये प्रतिष्ठा पणाला

त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ मेळा डोळ्यांसमोर ठेवून शहराचे प्रथम नागरिकपद आपल्याकडेच कसे राहील, यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच पक्षीय उमेदवारांसह आठ उमेद्वार रिंगणात असून येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षपद (सर्वसाधारण), कैलास घुले (भाजप), सुरेश गंगापुत्र (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), त्रिवेणी तुंगार (शिवसेना शिंदे), दिलीप पवार (काँग्रेस), किरण चौधरी (आप), दीपक गिते, स्वप्निल शेलार, महेंद्रकुमार पवार (अपक्ष)

मनमाडला जातीय समीकरणाभोवती निवडणूक

मनमाडमध्ये आजवरच्या निवडणुका पाणीप्रश्नावर लढवल्या गेल्या आहेत. मात्र, यावेळी करंजवण पाणी योजना पूर्णत्वास गेल्याने उमेदवारांना अन्य मुद्दे घेऊन मतदारांना सामोरे जावे लागले आहे. पाणीप्रश्नाचे श्रेय आणि जातीय समीकरणे याभोवतीच ही निवडणूक फिरल्याचे चित्र दिसून आले. नगराध्यक्षपदासाठी सहा राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह आठ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. उमेदवारांची संख्या अधिक असली
तरी तिरंगी लढत रंगली.

नगराध्यक्षपद (सर्वसाधारण), रवींद्र घोडेस्वार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), योगेश पाटील (शिवसेना शिंदे), प्रवीण नाईक (शिवसेना उबाठा), प्रवीण पगारे (बसपा), डॉ. नितीन जाधव (वंचित), शुभम चुनियन (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), राजू निरभवने, नामदेव हिरे (अपक्ष)

ओझरला पंचरंगी लढत लक्षवेधी

ओझरमध्ये वर्चस्वाची लढाई, ओझरच्या नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत पाच पक्षीय उमेदवारांमध्ये रंगली. आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांनी निवडणुकीला वर्चस्वाच्या लढाईचे स्वरूप दिले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

नगराध्यक्षपद (अनु. जाती महिला), अनिता घेगडमल (भाजप), प्रज्ञा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), जयश्री जाधव (शिवसेना उबाठा), श्वेता आहिरे (शिवसेना शिंदे), मालती बंदरे (काँग्रेस), मंगल कुन्हाडे व मनीषा लोहकरे (अपक्ष)

सिन्नरला मंत्री-खासदार लढत

सिन्नरच्या नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी पक्षीय उमेदवारांसाठी माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे व उदय सांगळे यांनी येथील लढत प्रतिष्ठेची केली.

नगराध्यक्षपद (सर्वसाधारण), हेमंत वाजे (भाजप), विठ्ठल उगले (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), प्रमोद चोथवे (शिवसेना उबाठा), नामदेव लोंढे (शिवसेना शिंदे), किशोर देशमुख (अपक्ष)

इगतपुरीत परिवर्तन होणार का?

इगतपुरीत चार पक्षीय उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असून या पक्षांच्या नेत्यांनी सभा व रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सुजात आंबेडकर यांनी वर्चस्वासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. तीन दशके सत्तेवर असलेल्या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.

नगराध्यक्षपद (ओबीसी महिला), शालिनी खताळे (शिवसेना शिंदे), मधुमालती मेद्रे (भाजप) शुभांगी दळवी (काँग्रेस), अपर्णा धात्रक (वंचित बहुजन आघाडी)

सटाण्यात मित्रपक्षांमध्ये तिरंगी लढत

सटाण्यात महायुतीतील मित्रपक्षांमध्येच तिरंगी लढत होत आहे. यासाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे यांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्याने येथे रंगत वाढली आहे.

नगराध्यक्षपद (ओबीसी महिला), योगिता मोरे (भाजप), हर्षदा पाटील (शिवसेना शिंदे), रूपाली कोठावदे (अपक्ष).

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...