नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात यावर्षीच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून नाशिक शहराचे तापमान रविवारी (दि.९) पहाटे १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमानातही काहीशी घट झाली असून कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (ता. करमाळा) येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले, जे थंडीची लाट म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नाशिकसह महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर व उत्तर अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सीअसने तर विदर्भात २अंश सेल्सीअसने किमान तापमान खालावून सप्ताहभर म्हणजेच शनिवार (दि.15) पर्यंत चांगल्या थंडीची शक्यता जाणवते, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
जेऊरमध्ये तापमान इतके खाली का ?
जेऊर हे अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्याची भौगोलिक रचना अहिल्यानगर शहरासारखीच आहे. मात्र, रविवारी सकाळी ८:३० वाजता जेऊरमध्ये सापेक्ष आर्द्रता फक्त ५७ टक्के नोंदली गेली महाराष्ट्रातील सर्वात कमी परभणीत ५३ टक्के होती. सध्या हवेत पाण्याची वाफ कमी असल्याने रात्री थंडीचा प्रभाव जास्त जाणवतो. यामुळेच जेऊरमध्ये तापमान १० अंशांपर्यंत खाली आले, असे ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.




