नाशिक | प्रतिनिधी
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होणारी नीट परीक्षा रविवारी झाली. दहा हजार 378 पैकी 10120 जणांंनी ही परीक्षा नाशिकमध्ये दिली. मात्र, या परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही उशिरा आल्यामुळे नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना परीक्षेला मुकावे लागले.
परीक्षेची वेळ दुपारी दोनची असली तरी, सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान दीड वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक होते. तशा सूचना पत्रकात नमूद केल्या होत्या. मात्र, नाशिकमधील वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात दोन विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर दीड वाजेनंतर दाखल झाल्या. परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार आणि सुरक्षा प्रक्रियेनुसार त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्राच्या अधिकार्यांकडे विनंती केली. मात्र, परीक्षेचे राष्ट्रीय नियम अत्यंत कठोर असल्याने त्यांना परीक्षा द्यायची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे विद्यार्थिनींचे एक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली.
नाशिकच्या मराठा हायस्कूल येथील नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करण्यास विलंब झाल्याचे दिसले. बायोमेट्रिकसाठी तांत्रिक अडचणीत येत असल्याची माहिती समोर आली. यामुळे परीक्षा केंद्रावर सुमारे एक तास विद्यार्थी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. मात्र बायोमेट्रिकचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
बायोमेट्रिक न झाल्यास परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. तर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. हातातील दोरे, पाण्याच्या बाटलीचे स्टिकर आणि पायातील चप्पल देखील काढून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत सोडलेे. विद्यार्थ्यांसाठी उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी परीक्षा केंद्रावर प्राथमिक उपचार साधनसामुग्री देखील ठेवण्यात आली होती. किरकोळ अपवाद वगळता परीक्षा शांंततेत झाली, असे या परीक्षेचे जिल्हा समन्वयक दीपक अहिरे यांंनी सािंंगतले.