Thursday, September 19, 2024
Homeनगरनाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

जिल्ह्यात 17 हजार 392 मतदार || मतदानासाठी आज साहित्य वाटप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (बुधवारी) मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून मतपत्रिका व इतर साहित्याचे वाटप होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत, त्यातील सर्वाधिक, 9 उमेदवार नगर जिल्ह्यातील आहेत. मतदारसंघात नगरसह नाशिक, जळगाव धुळे व नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

शिक्षक मतदार संघाची निवडणूक मागीलप्रमाणेच यंदाही पैसे, साड्या, कापड वाटप या मतदारांना दाखवल्या जाणार्‍या प्रलोभनाच्या आरोपावरून गाजत आहे. नगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदार आहेत. त्यांची जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर, संगमनेर येथे प्रत्येकी 3, राहता व कोपरगाव येथे प्रत्येकी 2 तर इतर सर्व तालुक्यातून प्रत्येकी 1 मतदान केंद्र आहेत. नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरून ‘वेब कास्टिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर 5 याप्रमाणे नगर जिल्ह्यात 100 वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना दोन वेळेला प्रशिक्षण दिले गेले आहे.

मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे तर मतदान करताना ते प्राधान्यक्रमाने करावे लागणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. मतदान संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मतपेट्या राहाता येथे संकलित करून त्यानंतर मतमोजणीसाठी नाशिकला रवाना केल्या जाणार आहेत. मतमोजणी 1 जुलैला अंबड (नाशिक) येथील एमआयडीसीच्या गोदामात होणार आहे.

21 पैकी 9 उमेदवार नगर जिल्ह्यातील
निवडणुकीच्या रिंगणात नगर जिल्ह्यातील भागवत गायकवाड (संगमनेर), अमृतराव उर्फ आप्पासाहेब शिंदे (नगर), भाऊसाहेब कचरे (नगर), विवेक कोल्हे (कोपरगाव), संदीप गुरूळे (कोपरगाव), सचिन झगडे (श्रीगोंदे), दिलीप डोंगरे (संगमनेर), डॉ. छगन पानसरे (शेवगाव), व रणजित बोठे (राहाता) असे एकूण 9 उमेदवार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या