नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक
निवडणुकांची साधी चाहूल लागली तरी पुढारी एकदम अॅक्टिव्ह मोडमध्ये येतात. त्यामुळे सतत निवडणुका होत राहिल्या पाहिजे असे जनतेला वाटत राहते. ‘लाडकी बहिणीं’चा उमाळा तत्कालीन राज्य सरकारला का आला, जैन,बारी,तेली,हिंदू खाटीक ,लोणारी अशा विविध जातींची महामंडळे करण्याचा निर्णय का घ्यावासा वाटला, बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, बेरोजगारांना रोजगार भत्ता वगैरे असंख्य योजना गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आल्या. सार्या जनतेचेच चांगभलं झाल्याने महायुती सरकारला मायबाप जनतेने डोक्यावर घेतले. आता यातील किती योजना चालू आहेत याची ना लाभार्थींना फिकीर, ना सरकारला.
साहजिकच निवडणुका आल्या की काही तरी हालचाल सगळ्याच पातळ्यांवर होते, हे आता जनतेच्याही मनात पक्कं ठसले आहे. त्यामुळेच नाशिकचे प्रवेशद्वार समजले जाणारे द्वारका सर्कल एकाएकी पुढार्यांच्या केंद्रस्थानी आले म्हणजे निवडणुका आल्या असे लोकांना वाटू लागले आहे. त्यांचे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही. कारण द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी ही समस्या गेली काही वर्षे एवढी गहन बनून गेली होती की संयुक्त राष्ट्र संघातच आता यावर तोडगा काढला जावा असे लोक बोलायला लागले होते. पाणी अडविले की मागच्या बाजूला फुगवटा येतो, या नैसर्गिक न्यायाने द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा मुंबई नाका, आडगाव नाका, इंदिरानगर अंडरपास असे करत करत सगळ्या शहरातच हा कोंडीचा फुगवटा येतो आणि नाशिककर चडफडत राहतात. बरे हा फुगवटा केवळ महामार्गांवरच होतो असेही नाही, एकदा का द्वारका सर्कल ठप्प झाले की मग शहरात प्रवेशणारे सगळेच रस्ते कोंडीने बेजार होतात. हे असे गेली किमान दहा – बारा वर्षे तरी नाशिककर मोठ्या संयमाने सहन करीत आहेत. ही कोंडी फोडण्याचे प्रयत्न भरपूर झाले, यात शंका नाही.
यापूर्वी ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक बेट तयार केले गेले, नंतर ते मोठे केले गेले, पुढे त्याची अडचण वाटायला लागल्यानंतर त्याचा घेर कमी केला गेला. मध्येच कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून पायी चालणार्यांसाठी भुयारी मार्गाची कल्पना आली. लागलीच ती अंमलात आली. अगदी नाशिकला दोन भागात कापणारा उड्डाण पुलही साकारला. या सगळ्या उपायांवर करोडोचे द्रव्य खर्ची प़डले. पण नाशिककरांच्या मनस्तापात मात्र दुर्दैवाने भरच पडत गेली. राष्ट्रीय महामार्ग, पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते अशा विविध खात्यांनी या समस्येवर तोडगा काढण्याचे वारेमाप प्रयत्न केले. प्रत्यक्षात या चौकातील वाहतूक कोंडीची भुताटकी काही गेली नाही. पादचार्यांसाठीच्या भुयारी मार्गाचा चक्क एकही दिवस वापर झाला नाही. लोकांनी त्या मार्गाचा वापर करावा म्हणूनही काही उपाय केले गेले. पण, लोकही एवढे मुजोर की त्यांनीही रस्त्यांवरुनच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यातच धन्यता मानली. मुंबईच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रसिद्ध असलेले आयपीएस अधिकारी पसरिचा यांनाही बोलावण्यात आले. त्यांनी पाहणी करुन काही उपाय सुचविले. काही
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या कोंडींवरील उपायांसाठी संशोधन प्रकल्पही दिला गेला. पण काहीच फरक पडला नाही. अलिकडे तर तेथील वाहतूक कोंडी ही एवढी भीषण होऊ लागली की असंख्य मान्यवरांनाही त्याचा फटका बसू लागला. राजकीय संस्थानिक आले की पोलिसांना नाइलाजाने त्यांच्या सुरळीत प्रवासासाठी रस्ते अडवावे लागतात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा तर आणखी एक अजबगजबच मामला. हा सारा कोंडीचा प्रवास यासाठी आठवावा लागला, कारण गेल्या आठवड्यात अचानक आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका सर्कलची समस्या तसेच इतरही अनेक प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक घेऊन अधिकार्यांना धारेवर धरले. दुसर्या दिवशी संबंधीत अधिकार्यांबरोबर पाहणी करुन या समस्येवर तोडगा काढण्याबाबत आग्रह धरला. पाठोपाठ तिसर्या दिवशी येवल्याचे आमदार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही द्वारका चौकाची पाहणी केली. यावेळीही संबंधीत विविध विभागांचे अधिकारी हजर होते. भुजबळ साहेबांचा अनुभव तसेच अधिकारही मोठा. परिणामी त्यांच्या आदेशांचे तत्काळ पालन व्हायला लागले. चौकातील उड्डाणपुलाखालील वाहतूक बेट लगोलग काढण्याचे काम हाती घेतले. पाठोपाठ चौकानजीकच्या अतिक्रमित टपर्यांवर कारवाई सुरु झाली. चौक आता मोकळा श्वास घेणार अशा बातम्या झळकू लागल्या. सिग्नल यंत्रणा सुरु केली गेली. वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली गेली.
पण हाय रे दैवा. वाहतूक कोंडी काही दूर व्हायला तयार नाही. किमान पंधरा रस्ते एका ठिकाणी एकत्र येत असल्याने तेथील वाहतुकीबद्दल संशोधनाअंतीच तोडगा काढायला हवा. केवळ वाहतूक बेटाचा घेर कमी करणे किंवा सिग्नल यंत्रणा बसवून ही समस्या सुटणारी नाही. सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना लेनची शिस्त पाळण्यासंदर्भात प्रशिक्षित करावे लागेल. बेशिस्त व बेमुर्वतखोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर व्हावे लागेल. या बेशिस्तीत आता बेपर्वा सिटीलिंक चालकांची भर पडली आहे. त्यांच्यावरही नियमभंग केल्यास कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत दाखवावी लागेल. हे सारे एकाचवेळी केले गेले तरच येथील समस्या सुटण्याची अंधुकशी आशा करता येईल. भुजबळ व फरांदे यांनी पुढाकार घेतला ही समाधानाची बाब आहेच. त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद द्यायलाच हवेत.
फक्त त्यांनी हीच तत्परता यापूर्वी गेल्या काही वर्षात दाखविली असती व त्याचा सातत्याने पाठपुरावा केला असता तर कदाचित आज नाशिककर सुखासमाधानाने या चौकातून जा-ये करतांना दिसले असते. दोन्ही मान्यवरांची ही दखलपात्र सजगता येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय आहे. निवडणुका आल्या म्हणून का होईना पण आपल्या लोकप्रतिनिधींना अशा गंभीर समस्येचा आठव व्हावा व लागलीच त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावयास लागावे, हे नाशिककरांचे थोर भाग्य! द्वारका चौकाचे हे रुदन उशिरा का होईना पण दूर व्हावे आणि किमान सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तरी नाशिकच्या या प्रवेशद्वाराला सर्वार्थाने सौंदर्याची झळाळी प्राप्त व्हावी ही अपेक्षा.





