सिन्नर | वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी माळेगाव एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. सदर कंपनीमध्ये अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारी पावडर तयार केली जाते. ही पावडर विविध केमिकल्सपासून तयार केली जात असल्याने कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे (Chemical) ड्रम साठवलेले होते. याच केमिकलच्या ड्रमला आग लागल्याने काही क्षणातच आग संपूर्ण युनिटमध्ये पसरली आणि कंपनीतील साहित्य व यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.
विशेष म्हणजे, या केमिकल ड्रमवर पाणी (Water) मारल्यास आग अधिक भडकत असल्याचे घटनास्थळी दिसून येत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मदत मागविण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका अग्निशमन दल देखील काही वेळात घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आगीची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असून सिन्नर परिसरातील वॉटर टँकर धारकांना घटनास्थळी तातडीने पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचे काम करत आहेत. मात्र, केमिकल ड्रममुळे आग सतत भडकत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. घटनास्थळी पोलिस व प्रशासनही दाखल झाले असून संपूर्ण परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.





