Monday, February 2, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : काजू उद्योगाचे 'गडद अर्थचक्र'; गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकास गंडा

Nashik Fraud Crime : काजू उद्योगाचे ‘गडद अर्थचक्र’; गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकास गंडा

४६ लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काजू प्रक्रिया आणि निर्यातीसारख्या विश्वासार्ह वाटणाऱ्या उद्योगाच्या नावाखाली गुंतवणुकीचे आमिष दाखवत शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल ४६ लाख ८९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

राजेंद्र पंढरीनाथ अमृतकर, प्रसाद राजेंद्र अमृतकर (दोघे रा. मु. पाे. सोनगीर, ता. जि. धुळे) व अमन महादेव जाधव(रा. अटलांटा, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी संशयितांची (Suspected) नावे असून अमन हा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते. तर, अमृतकर हे पितापुत्र आहेत. तिघेही पसार असून त्यांचा शाेध सुरु असल्याचे पाेलिसांनी सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार गंगापूर हद्दीत सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडला आहे.

YouTube video player

मयूर प्रकाश अलई (वय ४३, रा. गार्डन व्हूव्ह, गुलमाेहाेर काॅलनी, गंगापूर राेड) यांच्या फिर्यादीनुसार, ते मेडिकल क्षेत्रात कार्यरत असून संशयितांनी स्वतःला काजू प्रक्रिया व व्यापाराशी संबंधित उद्योगाशी जोडलेले असल्याचे भासविले. “रेशम काजू मार्ट” नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला ठराविक टक्केवारीने परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून मयूर यांनी ४६ लाख ८९ हजार रुपये रक्कम गुंतविली. तसेच, त्यासंदर्भाने संशयितांनी नाेटरी व करारनामाही करुन घेतला.

त्यानंतर, संशयितांनी दरमहा परताव्याची रक्कम देण्यासाठी धनादेश दिले. मात्र, ते वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने वारंवार परत आले. यानंतर मयूर यांनी जाब विचारला असता, प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा करण्यात आला. “आज-उद्या पैसे मिळतील”, “व्यवहार अडचणीत आहे”, अशी कारणे देत पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. संयम राखूनही पैसे न मिळाल्याने अखेर मयूर यांनी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. गुन्हा दाखल असून आर्थिक व्यवहारांच्या सखोल तपासासाठी कागदपत्रे आणि बँक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे.

तक्रारी वाढणार

प्रकरणात आणखी काही गुंतवणूकदार फसले आहेत का, याचाही शोध घेतला जात असून तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमन जाधवने हा काजू प्रक्रिया व्यवसाय सुरु केल्याचे समाेर येत असून त्यामाध्यमातून त्याने अॅकेडमी सुरु करुन कार्यालयात काजू प्रक्रिया उद्याेगाला लागणारी मशिनरी आणल्याचेही समाेर येत आहे. अलई व अमृतकर यांची धुळे व सटाणा येथील ओळख असल्याने त्यातून हा व्यवहार झाल्याचे तपासात पुढे आले आहे. 

ताज्या बातम्या

सुनेत्रा

DCM Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा; प्रितिसंगमावर जात स्व....

0
सातारा | Sataraराज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर जात राज्याचे...