नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक मर्चन्टस् को ऑपरेटिव्ह बँकेत (Namco Bank) वाहन तारण ठेवल्याचे दर्शवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सहा कर्जदारांसह १२ हून अधिक साक्षीदारांनी बँकेचे एक कोटी नऊ लाख रुपये लाटले. विशेष म्हणजे कर्जमंजुरीची प्रक रणे संशयास्पदरीत्या हाताळल्याने बँकेत हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या (Police) प्राथमिक तपासात समोर येत असून न्यायालयाच्या आदेशाने सहा प्रकरणात एकूण १८ जणांवर मुंबई नाका पोलिसांत शुक्रवारी (दि. ३०) गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, कर्ज मंजुरीसाठी संशयितांनी सादर केलेल्या एकूणच कायदेशीर व बनावट कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून केली जाणार आहे.
नाशिक मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेडच्या वतीने सहायक अधिकृत अधिकारी पंकज गोपीनाथ सोनजे यांनी संशयितांसह साक्षीदारांविरोधात फिर्याद (Case) नोंद केल्या आहेत. त्यानुसार सन २०१६ ते २०२२ या कालवधीत स्वाती गणेश शिंदे, वसीम मोहम्मद सादिक शेख, सचिन लक्ष्मण जाधव, संकेत भास्कर घावटे, जुबैर युनूस शेख, गोरक्ष सुरेश मोरे, रजीयाबी मोहम्मद सादीक शेख, असलम हुसेन शेख, सुमीत साहेबराव फड, उद्धव निंबा गवळी, सागर साहेबराव फड, शरद उत्तम घरटे, निसार अहमद मुख्तार अहमद सिदादीक, खंडेराव शिवराम झनकर, मोहित महेंद्र अग्रवाल, दिनेश भागूजी शिंदे, गुलाम हैदर निसार अहमद सिदिदीक, सुनील अशोक फटके या संशयितांनी (Suspected) कर्ज मिळवण्यासाठी नामको बँकेस बनावट कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे खरी आहेत असे भासवले.
त्यासाठी अनेक हायवा, डंपर, ट्रकची बनावट कागदपत्रे बनवून कर्ज मंजूर करून घेतले. हे कर्ज वितरीत झाले असताना बँकेने काही कर्ज प्रकरणांची छाननी के ली. त्यात बनावट सह्या, साक्षीदार, बनावट वाहने, कागदपत्रे सादर केल्याचे आढळले. तसेच बहुतांश प्रकरणांत कर्जाचा विनियोग दुसऱ्याच कारणांसाठी झाल्याचे उघड झाले असून वाहन तारण कर्जाची परतफेड केलीच नसल्याचे समोर आले. यासंदर्भात बँक व्यवस्थापनासह विधी विभागाने संशयितांविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात धाव घेत खटला चालवण्याचा अर्ज केला. त्यानुसार, न्यायालयाने एकाच वेळी सहा प्रकरणांवर कारवाई करून याबाबत फसवणुकीचे गुन्हे नोंदवून सखोल तपास करण्याचे आदेश मुंबईनाका पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, पुरावे संकलन सुरू आहे.
हे प्रकरण म्हणजे सात वर्षापूर्वी झालेल्या प्रकरणाची सुधारित फिर्याद आहे. सद्यस्थितीत गैरप्रकार नसून बँक सुस्थितीत सुरु आहे.
त्रिगुण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नामको बँक
सहा प्रकरणांतील कर्ज रक्कम रुपये
- प्रकरण एक ६ लाख ४० हजार १४०
- प्रकरण दोन १७ लाख २६ हजार ९०७
- प्रकरण तीन २१ लाख ७५ हजार ८५१
- प्रकरण चार १२ लाख ८९ हजार २८
- प्रकरण पाच २७ लाख ८८ हजार ६२८
- प्रकरण सहा २३ लाख २६ हजार ९५६
- एकूण एक कोटी नऊ लाख ४७ हजार ५१०
मुद्दे
- सर्वच कर्जदार, एजंट, साक्षीदारांचे संगनमत
- संशयित मुंबईनाका, वडाळा, इंदिरानगर, पंचवटी, पुणे येथील रहिवासी
- कर्जमंजुरीसाठी बनावट ट्रकचे फोटो, कागदपत्रे दाखवली
- कर्ज मंजूर करणारे तत्कालीन व्यवस्थापन रडारवर
- कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय मंजुरीचा संशय
- बँकेतला सूत्रधार शोधणार, पोलीस कागदपत्रे व्हेरिफाय करणार




