मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
लाडक्या विघ्नहर्ता गणरायास (Ganesh) आज भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत भक्तांनी गुलाल व फुलांची उधळण करत श्रीमूर्तींचे विसर्जन केले. शहरातील गणेश कुंडांवर लाडक्या गणरायाच्या श्री मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी सकाळी आठ वाजेपासून गर्दी केली होती.
शहरातील सार्वजनिक मंडळांनी सकाळी 11 वाजेपासून सजवलेल्या रथावर श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करत मिरवणुकीस प्रारंभ केला होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या संवाद्य मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झालेले होते. मुख्य मिरवणुकीस टिळक रोड येथून सायंकाळी पाच वाजता प्रारंभ झाला. आता मत तालीम संघ, भगवंत व्यायाम शाळा, पवनपुत्र व्यायाम शाळा, बजरंग तालीम संघ, प्रकाश तालीम संघ, संगमेश्वरतील भारत मंडळ, पवन मंडळ ,त्रिशूल मंडळ ,हिंदवी मंडळ, अमर मंडळ, आदी मंडळाच्या मिरवणुका ढोल ताशांच्या गजर करत मुख्य मिरवणूक मार्गावर येताच हजारो गणेश भक्तांनी एकच जल्लोष केला.
यंदा प्रथमच विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला तरुणी सहभागी झाल्या होत्या. फुलांबरोबर यंदा गुलालाची मुक्त हस्ते उधळण झाल्याने मिरवणूक मार्ग गुलाबी रंगाने नाहून निघाला होता. संगमेश्वर रामसेतू शनि चौक टिळक रोड तांबा काटा, आदी मार्गांवर सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका आल्याने हजारो फक्त ढोल ताशांच्या गजरात नाचत जल्लोष करत होते. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू आदी अधिकारी जातीने बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. शहरातील संवेदनशील भागात सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) मामको बँक ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले, युवा नेते अविष्कार भुसे शिवसेना महानगरप्रमुख विनोद वाघ, जिल्हाप्रमुख संजय दुसाने, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा निलेश कचवे, महानगरप्रमुख देवा पाटील, भाजप ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम सुनील गायकवाड मदन बापू गायकवाड काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद खैरनार राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव दिनेश ठाकरे अनंत भोसले प्रमोद शुक्ला, सुभाष गायकवाड, भरत पाटील, जितेंद्र देसले,तानाजी पाटील आधी नेत्यांनी सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकींना भेटी देत नाचत गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित केला.




