नाशिक | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागांतून आज दुपारी एक वाजेपर्यंत ९ हजार ६४१ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. यामध्ये पीओपीच्या ९ हजार ६५, तर शाडू मातीच्या ५७६ मूर्तींचा समावेश आहे. संकलित मूर्तींच्या तुलनेत पीओपी मूर्तींचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या विभागनिहाय अहवालानुसार, पंचवटी विभागातून सर्वाधिक ३ हजार ८४४ मूर्ती संकलित करण्यात आल्या. त्यापाठोपाठ नवीन नाशिक विभागातून १ हजार ८७१, नाशिक पूर्व विभागातून १ हजार २३६, सातपूर विभागातून ६०९, नाशिक पश्चिम विभागातून १ हजार १५८, तर नाशिक रोड विभागातून ३८४ मूर्ती संकलित झाल्या.
पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला निरोप; नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरवात
पीओपी मूर्तींमध्ये सहा फुटांपेक्षा कमी आकाराच्या ९ हजार ६५ मूर्तींचा समावेश असून, सहा फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींची नोंद झालेली नाही. शाडू मातीच्या ५७६ मूर्ती संकलित झाल्या असून, त्यापैकी ५७६ मूर्ती सहा फुटांपेक्षा कमी आकाराच्या आहेत.
विसर्जनानंतर संकलित करण्यात आलेल्या या मूर्तींची पुढील विल्हेवाट आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम्यान, विसर्जनाची प्रक्रिया सुरू असल्याने दुपारी एकनंतर संकलित होणाऱ्या मूर्तींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.




