नाशिक | प्रतिनिधी
आज गणेशविसर्जनाची राज्यभरात धूम पाहायला मिळतेय. यात हजारोंच्या संख्येने लोक हे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात.यंदा बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक (Nashik Ganesh Visarjan Miraunuk) वाकडी बारव (Vakadi Barav) येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan), आमदार देवयानी फरांदे (MLA Devayani Pharande), महापौर हिमगौरी आडके(Mayor Himgauri Adke) यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad), पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (Sandip Karnik) आणि मनपा आयुक्त मनिषा खत्र (Manisha Khatri) यांची उपस्थिती होती. नाशिकच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ वाकडी बारव येथून होण्याची परंपरा आहे.
मानाच्या गणपतींच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ
वाकडी बारव परिसरात सकाळपासूनच गणेशभक्तांची गर्दी झाली होती.पारंपरिक ढोल ताशांचा गजरात गणरायाचा जयघोष आणि उत्साहाच्या वातावरणात मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या गणपतींच्या सहभागामुळे मिरवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी होतात.
सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत; राज ठाकरेंची ज्ञानेश कुमारांवर टीका
महाजनांनी वाजविला ढोल
मिरवणुकीच्या प्रारंभी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ढोल वाजवून गणेशभक्तांचा उत्साह वाढविला. त्यांच्या ढोलवादनाला उपस्थितांनी दाद दिली. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत लोकप्रतिनिधींनी पारंपरिक वाद्य वाजविण्याची नाशिकमध्ये यापूर्वीही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. २०२५ मध्येही गिरीश महाजन यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजविला होता.
महापौर हिमगौरी आडके यांची उपस्थिती
शहराच्या महापौर हिमगौरी आडके यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून यापूर्वीच मार्गाची पाहणी, वाहतूक व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता.
बडगुजरांनी वाजविला टाळ
मिरवणुकीच्या उत्साहात सुधाकर बडगुजर यांनीही टाळ वाजवत सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषात मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.
ड्रोन, सीसीटीव्हीचे कवच
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष डिजिटल नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व प्रमुख चौक व सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड थेट पोलीस आयुक्तालय व स्मार्ट सिटीच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडले आहे. हवेतून ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण गर्दीवर नजर ठेवली जाईल.
असा आहे सुरक्षेचा प्लॅन
४ उपायुक्त, ७ सहाय्यक आयुक्त, ४० निरीक्षक, १६७ सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक, २५०० अंमलदार (३ शिफ्ट), १३०० होमगार्ड, लोहमार्ग, मोबाईल-१ पथके, आरसीपी, झू आरटी, क्राईम ब्रान्च, एसआरपी
मिरवणुकीतील मंडळांचा क्रम
१. नाशिक महानगर पालिका (मानाचा शासकीय रथ), २. रविवारी कारंजा मित्र मंडळ, ३. गुलालवाडी व्यायाम शाळा, सोमवार पेठ, ४. भद्रकाली कारंजा मित्र मंडळ साक्षी गणेश, ५. श्रीमान सत्यवादी मित्र मंडळ, पेठरोड पंचवटी, ६. सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळ (नाशिकचा राजा), ७. सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी, ८. श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ, ९. रोकडोबा मित्र मंडळ, नाव दरवाजा, १०. शिवसेवा युवक मित्र मंडळ, गाडगे महाराज पुतळा, ११. शिवमुद्रा मित्र मंडळ, (मानाचा राजा), १२. युवक मित्र मंडळ, मुंबई नाका, १३. दंडे हनुमान मित्र मंडळ, काजीपुरा चौक, १४. युनायटेड फ्रेंड्स सर्कल, संदिप हॉटेल समोर, १५. श्री शनेश्वर युवक समिती, चौक मंडई, १६. नेहरूचौक मित्र मंडळ, पिंपळपार, १७. वेलकम सहकार्य मित्र मंडळ, १८. गजानन मित्र मंडळ, १९. महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, २०. शिवस्य जनसेवा समिती, बुरुड गल्ली, २१. भोई मित्र मंडळ, भोई गल्ली, कथडा, २२. नवक्रांती मित्र मंडळ, काठे गल्ली, २३. विनय नगर मित्र मंडळ, विनय नगर, २४. श्री तिळभांडेश्वर मित्र मंडळ, सराफ बाजार, २५. हिंदू एकता आंदोलन पक्ष, द्वारका.




