Monday, September 23, 2024
Homeनगरनाशिक पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान

नाशिक पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सोमवार (दि.30) मतदान प्रक्रिया होवून विभागातील पाच जिल्ह्यात 49.28 टक्के मतदान झाले. विभागात 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के आहे.

तर नगर जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 638 मतदारांपैकी 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण 50.40 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

सोमवारी झालेल्या मतदानात विभागातील नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652 मतदारांपैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. नगर जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे.

धुळे जिल्ह्यात 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगावमध्ये 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

सोमवारी नगर जिल्ह्यात मतदानासाठी राजकीय नेत्यांची धावपळ होती. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे मतदान केले. संगमनेर तालुक्यात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उमेदवार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी सोनई येथील केंद्रावर मतदान केले. माजी मंत्री, आमदार शंकरराव गडाख यांनी पत्नी सुनिता गडाख यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. आ. संग्राम जगताप यांनी नगरमधील रेसिडेन्सिअल केंद्रावर मतदान केले.

जिल्ह्यात 79 हजार 923 पुरूष मतदार, तर 35 हजार 715 महिला मतदार होत्या. मतदानासाठी प्रत्येक महसूल मंडळावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शहरी भागात जास्त मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात 147 केंद्रांवर मतदान झाले. सरासरी एक ते दीड हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी एक हजार 500 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला.

निवडणुकीची मतदान प्रक्रिया अचूक व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण दिले होते. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 29 हजार 115 मतदार होते. तेथे सर्वाधिक 28 केंद्रे होते. राहाता तालुक्यात 15 मतदान केंद्र होते. जामखेड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे पाच मतदान केंद्र होते. सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत 37 हजार 641 मतदारांनी म्हणजेच 32.55 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथची उभारणी केली होती. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

तालुकानिहाय मतदान, कंसात टक्केवारी

अकोले 4 हजार 41 (49.82), संगमनेर 17 हजार 95 (58.72), राहाता 6 हजार 339 (41.55), कोपरगाव 2 हजार 348 (39.56), श्रीरामपूर 3 हजार 609 (44.39), राहुरी 3 हजार 610 (46.46), नेवासा 3 हजार 828 (55.60), नगर 5 हजार 122 (49.33), पाथर्डी 2 हजार 62 (48.16), शेवगाव 1 हजार 729 (41.73), पारनेर 1 हजार 908 (50.74), श्रीगोंदा 2 हजार 527 (57.63) आणि कर्जत 1 हजार 749 (60.39) असे आहे.

जिल्हाधिकारी-पोलिस अधीक्षकांकडून देखरेख

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर आणि उत्तर जिल्ह्यातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

शुभांगी पाटील यांना मतदान केंद्रावर रोखलं, प्रचाराचा आरोप

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना संगमनेर मतदान केंद्रावर रोखण्यात आलं. शुभांगी पाटील प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रांत अधिकारी मंगरूळे यांनी शुभांगी पाटील यांना रोखलं. मतदारांना हात जोडून मतदान करण्याची विनंती शुभांगी पाटील करत होत्या.. यावेळी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला.

भविष्यातही मी अपक्षच राहीन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मी अपक्ष उमेदवार आहे, भविष्यातही मी अपक्षच राहीन, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या परिवाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही इतकी वर्षे काँग्रेस पक्षात असल्यामुळे या सगळ्यावर प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर दिले नाही. पण मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ही माहिती चुकीची आहे. मी फॉर्म भरतांना काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच अर्ज भरला होता. तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे माझा फॉर्म अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला. आता आपण अपक्षच आहोत, असा गौप्यस्फोट अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे यांनी केला.

संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर श्री. तांबे प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, नाशिक पदवीधर मतदार संघात माझ्या वडीलांनी गेली 14 वर्ष प्रतिनिधीत्व केले. पाचही जिल्ह्यात त्यांचा ऋृणानुबंध त्यांनी सामान्य जनतेशी, मतदारांशी तयार केला त्यामुळे ही निवडणूक सोपी व एकतर्फी निवडणूक झाली.

सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माझी सोबत दिली. पक्षीय भेदाभेद विसरुन सर्व सोबत होते. आम्ही देखील फक्त निवडणुकीपुरते राजकारण करत असतो. निवडणूक झाल्यानंतर आमचा परिवार पुन्हा सर्वसामान्यांच्या कामासाठी तयार असतो. कधीही आम्ही पक्षीय भेदाभेद ठेवत नाही.

100 पेक्षा अधिक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. सर्वांनी अगदी प्रेमाने मला साथ दिली. 54 तालुके 4 हजार गावांपेक्षा अधिक असलेला हा मतदार संघ आहे. उत्तर महाराष्ट्र, खान्देश पट्टा यामध्ये येतो. सगळ्या मतदार संघात आमच्या परिवाराला प्रतिसाद दिला आहे. सर्वांच्या ऋृणात राहील, आगामी काळात त्यांच्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या