नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूर तसेच सातपूर पाेलिसांच्या (Gangapur Police) हद्दीच्या वेशींवरील पारिजात शुक्रवारी (दि. १४) दाेन वर्षीय बिबट्याने (Leopard) दोन तास धुमाकूळ घातला. ताे सुरु असतानाच कुंभमेळा मंत्री आपल्या लवाजाम्यासह दाखल झाले. त्यांनी बचावकार्यात सहभाग घेतला असता स्थानिकांसह काही कामगार वर्गासह रीलबाजांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे गर्दी नियंत्रणाचे नियाेजन फिस्कटून चवताळलेला बिबट्या दाेनदा बचाव पथकाच्या ताब्यातून निसटला.
अखेर शेवटच्या प्रयत्नात पथकाने ‘ट्रॅन्क्यूलाइज’ गनद्वारे बेशुद्धीच्या ‘डार्ट’ चा अचूक नेम साधल्यामे दमलेला बिबट्या तीन मिनिटांत बेशुद्ध झाला. त्यानंतर पथकाने पिंजराबंद करुन त्याला म्हसरुळच्या ‘टीसीसी’ मध्ये दाखल केले. संत कबीरनगराकडून कामगार नगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेतीन वाजता बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले. परिसरातील नागरिकांनी वनविभाग व पोलिसांना बिबट्याची खबर दिली. दोन्ही पथके पोहोचल्यावर बिबट्या परिसरातील बंगल्यांमध्ये उड्या घेत चपळतेने सैरावैरा धावत सुटला.
नागरिकांच्या (Citizen) गर्दीसह आवाजामुळे बिबट्या बिथरला आणि झुडूपांमध्ये दबा धरुन बसला. काहीवेळाने ‘तारांमगल-बी’ सोसायटीच्या तळमजल्यात लपलेल्या बिबट्याभोवती चहूबाजूने जाळी लावण्यात आली. मात्र, तितक्यात एका वनरक्षकावर त्याने जाळीतून पंजा बाहेर काढून हल्ला केला. त्यानंतर काही सेकंदात ‘ट्रॅन्क्यूलाइज गन’द्वारे ‘डार्ट’ बसताच त्याने पुन्हा धाव घेतली मात्र, काही पावले धाव घेतल्यानंतर तो बेशुद्ध झाला. बिबट्या जेरबंद हाेताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गुरुकूल सोसायटीत अंतिम लपंडाव
बिबट्याने पळ काढत गुरुकुल सोसायटीतील ‘तारा मंगल बी’ या इमारतीच्या एका छोट्या, सामानाने भरलेल्या खोलीत लपण्याचा प्रयत्न केला.वनविभागाने तत्काळ परिसरात जाळ्या लावल्या आणि बेशुद्धीकरणासाठी तीन डार्ट झाडले. यापैकी दोन वाया गेले; पण एक मर्मस्थानी लागल्याने बिबट्या आक्रमक झाला. त्याने जाळ्यांवर झेप घेत त्यातून निसटून पुन्हा संत कबीर नगर मैदानाकडे धाव घेतली. डर्टचा परिणाम झाल्याने ताे निपचित पडला. परिसरातील अनेक नागरिकांनी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.एक बिबट्या पकडला असला तरी दुसरा अद्याप आसपास असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. परिसरात वनकर्मचारी गस्त करत असून अतिरिक्त पिंजरेही बसविले जात आहेत.
मंत्री महाजनांनी घेतली जखमींची भेट
या सर्व घडामोडींमध्ये मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे रेस्क्यू टीमबरोधर आघाडीवर होते. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाचे रांजय गोलाईत व संतोष बोडके हे कर्मचारी जखमी झाले तर एक नागरिक राहुल देवरे व शारदा साबळे असे एकूण चार जण जखमी झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची श्री गुरुजी रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच त्यांच्या कुटुंबियांनादेखील याप्रसंगी धीर दिला. मंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या धाडसीपणामुळे नाशिककरांकडून मंत्री महाजन यांचे कौतुक होत आहे.
आला आला बिबट्या
- दुपारी ३.३० वाजता संत कबीरनगरकडून कामगारनगरच्या रस्त्यावर
- दुपारी ३.३५ वाजता गंगासागर कॉलनीच्या दिशेने दोघांवर हल्ला
- दुपारी ३.५५ वाजता शिवराज ज्वेलर्स, आशा पान स्टॉल भागातून धूम
- दुपारी ४ वाजता पान स्टॉलनजीक एका वृद्ध महिलेच्या अंगावरून झेप
- दुपारी ४.२५ पर्यंत गुरूसंपदा उद्यानानजीकच्या बंगल्यात
- दुपारी ४.३५ वन विहार कॉलनीकडे धावला; तारामंगल-बी इमारतीत लपला
- सायंकाळी ५.१५ वाजता जाळीतून पंजा काढून वनरक्षकावर बिबट्याचा हल्ला
- सायंकाळी ५.२१ वाजता इमारतीमागील झुडुपांमध्ये बिबट्या बेशुद्ध
- सायंकाळी ५.३३ वाजता बिबट्या पिंजराबंद
मुद्दे
- वनरक्षक प्रवीण गोलाईतच्या चेहऱ्यावर बिबट्याचा हल्ला
- वनरक्षक संतोष बोडके यांच्या हातापायावर बिबट्याचा हल्ला
- गिरीश भाऊ आलेत, आता बिबट्याचाही भाजप प्रवेश होईल’, अशी बघ्यांपैकी एकाने आरोळी देताच हशा पिकला
- बिबट्या पाहताच इमारती, बंगल्यांतून महिला, बालकांची आरडाओरड
- वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मदतीला त्र्यंबकेश्वरचे अधिकारी शेखर देवकरांचे पथक दाखल
- सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्यासह शीघ्र कृती दल दाखल
- तेरा पोलिस ठाणे, वाहतूक शाखेसह गुन्हे शोध पथकांचे निरीक्षक व पथके दाखल
- पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, अद्विता शिंदे घटनास्थळी
- बघ्यांची गर्दी पांगविण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी बळाचा वापर केला
- पारिजातनगर, कामगारनगराजवळील उपरस्त्यांवर वाहतूक काेंडी




