नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
गेल्या अनेक दिवसापासून वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) अखेर वनविभागाच्या (Forest Department ) जाळ्यात सापडला आहे. या बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यामुळे थोडासा का होईना नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत वनविभागाला चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे आहे. यापूर्वी तीन बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडनेर गेट, वडनेर दुमाला आणि पिंपळगाव खांब या परिसरात असंख्य बिबटे असून, हे बिबटे रात्रीच्या वेळी बाहेर निघतात व नागरिकांवर हल्ले करतात. त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यात बिबट्याने या परिसरातील वडनेर दुमाला, वडनेर गेट भागातील दोन बालकांवर हल्ला करून त्यांना जिवे ठार मारले होते. परिणामी या घटनेनंतर माजी नगरसेवक केशव पोरजे, योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, भैय्या मनियार, सागर निकाळे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान, त्यानंतर वनविभागाने वडनेर दुमाला व परिसरात तब्बल १८ पिंजरे व १५ कॅमेरे लावले होते. यानंतर आज (मंगळवारी) वडनेर गेट परिसरातील राजपूत कॉलनी येथे बिबट्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसला. त्यानंतर त्याला इंजेक्शन मारून बेशुद्ध करण्यात आले. यामुळे नागरिकांना (Citizen) सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्यामुळे शेतकरी बांधव जीव धोक्यात घालून शेतात काम करत असतात. तसेच नागरिकांना देखील जीव धोक्यात घालून कामावर जावे लागते. अजून असे नरभक्षक बिबटे पकडण्यात यावे ही विनंती वनविभागाला करण्यात आली आहे.
केशव पोरजे, माजी, नगरसेवक
पिंपळगाव खांब, वडनेर गेट आणि वडनेर दुमाला या भागात अजूनही मळे विभागात तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत. या बिबट्यांमुळे परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहे. त्यामुळे सर्वच बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे.
जगदीश पवार, माजी नगरसेवक




