सिन्नर | Sinnar
गेल्या दहा ते बारा दिवसापासून पंचाळे व परिसरात (Panchale Area) नरभक्षक बिबट्या (Leopard) रेस्क्यू करण्यासाठी सुरू असलेल्या वनविभाग अधिकारी (Forest Officer) व कर्मचारी यांना अखेर यश प्राप्त झालेले आहे.
काल (शुक्रवारी) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास चांगदेव लक्ष्मण जाधव यांच्या वस्तीवर डांबर नाला देवपूर शिवार (Devpur Area) येथे पंचाळे व परिसरात भयग्रस्त परिस्थिती निर्माण केलेल्या नरभक्षक बिबट्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेशुद्ध करून रेस्क्यू करत जेरबंद केले.
नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर व नाशिक सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, प्रशांत खैरनार, निलेश कांबळे यांच्यासमवेत इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, पेठ,बाऱ्हे, ननाशी हरसूल ,निफाड,संगमनेर, बोरिवली,सिन्नर व पेठ वन परिक्षेत्र व नाशिक विभागीय अधिकारी यांच्यासमवेत मोबाईल स्कॉड नाशिक (Nashik) असे जवळपास १३० ते १५० कर्मचाऱ्यांच्या रेस्क्यू टीमने ही कामगिरी यशस्वीपणे राबविली.
दरम्यान, या मोहिमेसाठी पंचाळे व परिसरातील पोलिस पाटील, सरपंच, गावातील पदाधिकारी, युवा वर्ग, ग्रामस्थ यांच्याकडून मोलाची साथ मिळाल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.





