नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
गेल्या दोन महिन्यात निष्पाप बालकावर (Child) हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या बिबट्याविरूद्ध आता वनविभाग (Forest Department) सुद्धा आक्रमक झाला आहे. याचाच एक भाग म्हणून वन विभागाने आता चक्क बिबट्याला ठार मारण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे.
या संदर्भात उपवनसंरक्षक विभागाचे अध्यक्ष सिद्धेश सावर्डेकर सहाय्यक वनरक्षक प्रशांत खैरनार, मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले, एनटीसीए प्रतिनिधी अभिजीत महाले, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ आदींनी स्वाक्षऱ्या करून राज्य सरकारकडे (State Government) पत्र पाठविले आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
पश्चिम नाशिक वन विभागअंतर्गत नाशिक वनपरिक्षेत्रातील मानवी जीवीतास धोकादायक ठरलेल्या बिबट्या या वन्यप्राण्यास अटकाव करण्यासाठी मानव वन्यजीव संघर्ष समितीची बुधवार (दि. २४) रोजी आढावा बैठक घेण्यात आली. वडनेर दुमाला या भागात राहणाऱ्या दोन वर्षीय श्रुतीक गंगाधर या लहान बालकाला घरच्या अंगणातून बिबट्याने उचलून नेले होते. दुसऱ्या दिवशी लष्करी जंगलात त्याचा मृतदेह मिळून आला होता. वडनेर दुमाला आर्टलरी सेंटर आजूबाजूला दाट झाडोरा असून, बिबट्याला येण्याजाण्या करिता मार्ग तसेच मुबलक प्रमाणात लपण्याकरिता जागा उपलब्ध आहे, घटना घरच्या आवारात घडली असून, लहान मुलांवर हल्ला होणे प्राण्यांचे अस्वभाविक वर्तन दर्शवते.
बिबट्या या वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना मुलाला राहत्या घरातून वडिलांसमक्ष घेऊन गेल्यामुळे भविष्यात अशा प्रकारे बिबट्या प्राणी घराच्या आत घुसून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.घटनेला कारणीभूत असलेला बिबट्या सदर क्षेत्रामध्ये आढळून आला असून, अशा परिस्थितीत पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये. नागरिकांचा रोष वाढू नये याकरिता ठोस उपाययोजना व्हावी ही परिस्थिती पाहता बिबट्या हा मानवी जीवितास धोकादायक झाला आहे, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडून बिबट्या जेरबंद करणे, त्याला बेशुद्ध करून पकडणे अथवा दोन्ही शक्य नसल्यास त्याला ठार करण्याची परवानगी मिळावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.




