देवगाव | वार्ताहर | Deogaon
निफाड व कोपरगाव तालुका (Niphad and Kopargaon Taluka) सरहद्दीवर असलेल्या देवगाव (Deogaon) येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) पहाटेच्या सुमारास वनविभागाने शरद जोशी यांच्या मालकी गट नंबर ४८५ मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला. सदर बिबट्या अंदाजे पाच वर्षे वयाचा नर असल्याचे रेस्क्यू टीमने सांगितले. दरम्यान या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश बोचरे, धनंजय जोशी, उपसरपंच लहानु मेमाने, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी (Student) वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस हवालदार औदुंबर मुरडणर, संदीप शिंदे व पोलिसांना घेराव घालून वनविभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला. जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी घेतला.
यावेळी वनविभागाचे अधिकारी पोलीस व आंदोलकांतही संघर्ष उडाला. परंतु, आंदोलकांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्याने वनविभागाने बिबट्यास ठार (Killed) मारण्याची परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठाकडे पत्रव्यवहार केला व देवगाव, रुई, देवगाव फाटा, वाकद परिसरात बिबट्याकडून जीवितहानी, वित्तहानी झाल्यास त्यास वनविभाग जबाबदार राहील असे पत्र घेतले.वनविभागाच्या वतीने रेस्क्यू टीम दाखल झाली असून, ड्रोनच्या सहाय्याने परिसर पिंजून काढण्यात येत आहे. याशिवाय परिसरात ठिकठिकाणी चार पिंजरे लावण्यात आले आहे.
दरम्यान, आंदोलनात (Agitation) जयेश लोहारकर, सचिन बोचरे, संतोष लोहारकर, ज्ञानेश्वर आरोटे, रेवणसिद्ध लोहारकर, बापू बोचरे, दीपक आढागळे आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस पाटील सुनील बोचरे, लासलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला.




