नाशिक | Nashik
नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) काल (दि.२९) रोजी महाविकास आघाडीकडून पराग (राजाभाऊ) वाजे (Rajabhau Waje) यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाजे यांनी उमेदवारी अर्जासोबत त्यांच्याकडे किती कोटींची संपत्ती आहे याबाबतचे एक प्रतिज्ञापत्र जोडले आहे. त्यानंतर आता त्यांच्या संपत्तीची (Assets) आकडेवारी समोर आली आहे.
निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पराग (राजाभाऊ) वाजे यांच्याकडे जंगम (चल) व स्थावर (अचल) अशी एकूण १४ कोटी ८० लाखांची संपत्ती आहे. यातील १३ कोटी २७ लाख ९१ हजारांची मालमत्ता ही त्यांची वर्डिलोपर्जित असून, राजाभाऊंनी स्वत: फक्त ३५ लाख रुपयांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत खरेदी केली आहे. तर सद्यस्थितीला त्यांच्याकडे १ कोटी ५२ लाखांची जंगम मालमत्ता आणि ३५ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
यासोबतच वाजेंनी एसबीआय व पतसंस्थेकडून १९ लाख १८ हजारांचे कर्ज देखील घेतले आहे. तर, २०१९ च्या सिन्नर विधानसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ७६ लाख सहा हजारांची जंगम मालमत्ता होती. मात्र यामध्ये पाच वर्षात दुपटीने वाढ होऊन एक कोटी ५२ लाखांवर ही मालमत्ता पोहोचली आहे. तसेच वाजे यांच्या स्थावर मालमत्तेचा विचार केला तर २०१९ मध्ये त्यांच्याकडे आठ कोटी ६७ लाख ६९ हजारांची मालमत्ता होती. यात वडिलोपर्जित मालमत्तेचाही समावेश होतो. मात्र, वाजेंना वारसाने मिळालेल्या जमिनी, पेट्रोल पंपांच्या किंमतीत वाढ झाल्याने ही मालमत्ता एकूण १३ कोटी २८ लाखांवर पोहोचली आहे.
तसेच राजाभाऊ वाजे यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था यांमध्ये १५ लाखांच्या जवळपास मुदत ठेवी देखील आहेत. तर दोन लाख ७१ हजारांचा वैयक्तिक विमाही त्यांनी उतरवला आहे. बुलेट, टॅक्टर, अॅक्टिव्हा, स्कॉर्पिओ, होंडा सिटी, इनोव्हा अशा गाड्या त्यांच्याकडे असून, ५७ हजार ६०० रुपयांचे सोने त्यांच्याकडे आहे. तर पत्नीच्या नावे १६ लाख २० हजारांचे (२२५ ग्रॅम) सोने असून, पेट्रोलपंप व फामर्स प्रोड्युसर कंपनीही त्यांच्या नावे आहे. याशिवाय अवघे ७० हजारांची रोख रक्कम राजाभाऊ वाजेंकडे असून गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ३५ लाखांची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit)) दिली आहे.