नाशिक | Nashik
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरवात झाली आहे. प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १२८ अर्जांची विक्री झाली आहे. तर ३ उमेदावरी अर्ज दाखल झाले आहे. यात प्रामुख्याने माकपचे माजी आमदार जे पी गावित, १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज आणि सुभाष चौधरी यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये भुजबळ समर्थक असल्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये भुजबळांचे अजूनही आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. माकपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करुन माजी आमदार जिवा पांडू गावित यांचा अर्ज दाखल केला. त्यांच्या गर्दीमुळे सीबीएस ते मेहेर हा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यांच्या पाठोपाठ १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी अनुराधा मुहुर्तावर निवडक समर्थकांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. स्वामी श्री शांतिगिरी महाराजांनी महायुतीकडून आणि नंतर महाविकासआघाडीकडून देखील चाचपणी केली होती. उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर असल्याने शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसल्याने नाशिक भाजपकडून स्वामी श्री शांतिगिरी महाराजांना अपेक्षा आहे.
आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करुन पुन्हा अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “लढा राष्ट्रहिताचा… संकल्प शुद्ध राजकारणाचा” हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. आपण देव, देश आणि धर्मासाठी आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक लढवणार असून भक्त परिवाराने आपल्याला विजयी करावे, असे आवाहन शांतिगिरी महाराजांनी केले आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
यांनी नेले उमेदवारी अर्ज
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांमध्ये , नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर, माजी महापौर दशरथ पाटील, माजी स्थायी सभापती दिनकर पाटील, स्वामी सिध्देश्वरानंद सरस्वती यांच्यासह ८७ इच्छुकांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज नेले आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व शिवाजी बर्डे यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून त्यासोबत अनामत रक्कमही जमा केली आहे. यासोबतच दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी ४० उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.