नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला (Protest) आता नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सकल मराठा समाजाचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके, शहर व ग्रामीण भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे (Mumbai) रवाना होण्याच्या तयारीत असून, यासाठी जिल्हाभरात जनजागृतीची अभूतपूर्व मोहीम राबविण्यात आली आहे.
आज (गुरुवारी) सकाळी नाशिक शहरातील (Nashik City) ग्रामदेवता कालिका माता मंदिर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी बैठक झाली. यावेळी श्री कालिका देवी संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, छावा संघटनेचे प्रमुख करण गायकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी, मराठा सोशल ग्रुपचे बंटी भागवत, बाळासाहेब लोंढे राम पाटील नाना जाधव प्रफुल्ल वाघ मराठा महासंघाचे राजेंद्र शेळके आधी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुंबईला जाणाऱ्या वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर तयार करण्यात आले. तसेच त्याचे वाटपही करण्यात आले. यात १० हजार फोर व्हीलर स्टिकर,२५ हजार टू व्हीलर व रिक्षा स्टिकर तसेच १५ हजार झेंडे तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर हे स्टिकर व झेंडे आज तालुकानिहाय तसेच शहरातील विविध भागांत वाटप करण्यात आले. तसेच समाजबांधवांना अजूनही स्टिकरची आवश्यकता असल्यास त्यांनी कालिका माता मंदिर (Kalika Mata Temple) येथून घेऊन जाण्याचे आवाहन करण गायकर व नानासाहेब बच्छाव यांनी केले आहे.
तसेच आजच्या मराठा समाजाच्या (Maratha Community) बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला नाशिक जिल्हा पूर्ण ताकदीने पाठिंबा देत आहे. राज्य सरकारसमोर (State Government) जरांगे यांनी मराठा समाजाच्या वतीने ठेवलेल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, असा ठाम इशारा याप्रसंगी देण्यात आला. याशिवाय “जसं पावसाला अडवता येत नाही, तसं मराठा समाजाच्या या महासागरास थांबवणं कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही”, असेही सकल मराठा समाजाच्या बैठकीत सांगण्यात आले.
दरम्यान, उद्या (शुक्रवारी) सकाळी सात वाजता ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर सर्व कार्यकर्ते स्वतःच्या गाड्यांमधून मुंबईकडे रवाना होतील, असेही यावेळी सांगण्यात आले. तर जिल्ह्यातील (District) मालेगाव, नांदगाव,मनमाड,येवला, लासलगाव, सिन्नर व इगतपुरी या ठिकाणांहून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
गणरायाच्या चरणी घातलं साकडं
नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी गणरायाला ‘तू विघ्नहर्ता आहेस,अनेक वर्षांपासून आमच्यावर असलेलं आरक्षणाचं विघ्न दूर कर. मराठा समाजाला ५० टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण देऊन न्याय मिळवून दे’, असं साकडं घातलं.





