नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीत (Mahapalika Election) भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) भाजपने सर्व नगरसेवकांना (Corporators) अज्ञातस्थळी हलविले आहे. मात्र, उद्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेली गुंतागुंत लवकरच सुटण्याची शक्यता असून, वरिष्ठ स्तरावर यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी दिली. त्यामुळे जर महायुती म्हणून सत्तास्थापन झाली तर नाशिकमध्ये उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होणार आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : भाजप विरोधकांची बेरीज पन्नास तरीही महापौर पदाच्या रिंगणात; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
महायुतीतील समन्वयाबाबत मुंबईत (Mumbai) वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी नाशिकमध्ये केली जाईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी, केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने नाशिकमध्येही दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करावे, अशी भूमिका पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनाला (शिंदे गट) उपमहापौरपद किंवा विषय समित्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपने महापौरपदासाठी उमेदवार जाहीर केला असताना, उपमहापौरपदासाठी शिंदे गटाकडून इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या विशेष महासभेत महापौर-उपमहापौर निवडणूक होणार असून, त्याआधीच महायुतीतील समन्वयाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास बोरस्ते यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : Nashik Mayor Election : भाजपला नगरसेवकांवर भरोसा नाय का? महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली विशेष खबरदारी
ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार?
उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिंदे सेना सत्तेत सहभागी झाली तर ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेकडून महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. जर वरिष्ठ पातळीवर महापालिकेत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्यात आला तर शिंदे सेनेला उपमहापौरपदाची लॉटरी लागू शकते. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. महापालिका निवडणुकीत भाजपचे ७२, शिंदे सेनेचे २६, ठाकरेंच्या शिवसेनेचे १५, काँग्रेसचे ०३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ०४, मनसेचा ०१ आणि एका जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.





