नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान (Voting) झाले होते. त्यानतंर आज (दि.१६) रोजी मतमोजणी झाली होती. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली होती. यानंतर आता निकाल लागला असता त्यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधील लढत अत्यंत लक्षवेधी ठरली. या प्रभागातील ‘अ’ गटातून भाजपने आधी दिपक बडगुजर यांना उमेदवारी देऊन नंतर मुकेश शहाणे यांना दिली. पंरतु, एबी फॉर्म उशीरा मिळाल्याने मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म असलेला अर्ज बाद झाला होता. त्यामुळे मुकेश शहाणे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. त्यानतंर उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शहाणे यांना भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी मनसे आणि उबाठाने शहाणे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही लक्षवेधी मानली जात होती. अखेर मुकेश शहाणे यांनी अपक्ष म्हणून आपला विजयश्री खेचून आणला.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
मुकेश शहाणे यांनी ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांचा पराभव केला. तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. त्यामुळे बडगुजर हे स्वत निवडून आले पण त्यांच्या मुलाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुकेश शहाणे यांना १४ हजार २८४ मते मिळाली आहेत. तर याच प्रभागातील इतर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात योगिता हिरे यांना १३००९, छाया देवांग यांना ९५४१ आणि भूषण राणे यांना ९१५६ इतकी मते मिळाली आहेत.
माजी महापौर मुर्तडक, वाघ, सुनील बागुलांना धक्का
मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पराभव केला आहे. महापालिका निवडणुकीआधी अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज केला. नंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना शिंदे सेनेने पुरस्कृत केले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांचा प्रभाग क्रमांक १३ मधून पराभव झाला आहे. त्यांचा मनसेच्या मयुरी पवार यांनी पराभव केला आहे. तर भाजपच्या माजी उपमहापौर भिकूबाई बागुल यांचा नातू आणि ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांचे पुत्र मनीष बागुल यांचा शिंदे सेनेच्या प्रमोद पालवे यांनी पराभव केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
माजी आमदार वसंत गीतेंनी गड राखला
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र व महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या मिलिंद थोरात यांचा पराभव केला आहे. या प्रभागात आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. मात्र, यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीस प्रथमेश गीते पिछाडीवर होते. परंतु,शेवटच्या फेऱ्यांमध्ये त्यांचा विजय झाला.
आमदार सीमा हिरेंनाही धक्का
नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण प्रभाग क्रमांक सात मधून त्यांचे दीर योगेश हिरे यांचा पराभव झाला आहे. शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी त्यांचा पराभव केला. महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपने आमदार हिरे यांची मुलगी रश्मी-बेंडाळे यांची घराणेशाहीचे कारण देत उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे रश्मी बेंडाळे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याने आमदार सीमा हिरे यांच्यावर नामुष्की ओढवली होती. त्यानंतर आता त्यांचे दीर योगेश हिरे यांचा पराभव झाला आहे.




