नाशिक | विजय गिते |Nashik
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) या नेहमीच विधानसभा, विधान परिषद, लोकसभा वा राज्यसभेच्या राजकारणाची पहिली पायरी मानल्या जातात. ग्रामपंचायतीपासून ते संसद भवनापर्यंतचा हा राजकीय प्रवास अनेकांसाठी स्वप्नवत असतो. नाशिक महानगराने (Nashik City) असे अनेक चेहरे पाहिले आहेत, ज्यांनी नगरसेवक म्हणून सुरुवात करून थेट विधानसभा, विधान परिषद्, संसदेत मजल मारली आहे.
असे तब्बल एक डझन दिग्गज चेहरे आहेत ज्यांनी राजकारणातील (Political) आपला आलेख उंचावला आहे. नाशिक महानगरपालिकेतील तब्बल एक डझन नगरसेवकांनी पुढे जाऊन आमदार, मंत्री आणि खासदार होण्याचा मान मिळवला आहे. ही उदाहरणे स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण किती प्रभावी ठरू शकते, हे अधोरेखित करतात.
नगरसेवक ते खासदार : यशस्वी वाटचाल
स्व. उत्तमराव ढिकले यांची राजकीय वाटचाल याचे उत्तम उदाहरण आहे. तत्कालीन नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार ते खासदार असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. डॉ. शोभा बच्छाव यांनी तर नगरसेविका महापौर, आमदार, मंत्री आणि आता खासदार असा यशस्वी टप्याटम्याने प्रवास केला आहे. हेमंत गोडसे हे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, त्यानंतर खासदार झाले. बाळासाहेब सानप नगरसेवक, अमहापौर, महापौर, आमदार झाले. वसंत गिते यांचाही राजकीय आलेख असाच आहे. ते नगरसेवक, महापौरनंतर आमदार झाले. निर्मला गावित आणि अपूर्व हिर हे नगरसेवक नंतर अनुक्रमे विधानसभा, विधान परिषदेवर गेले आहेत, देवयानी फरांदे या नगरसेविका, उपमहापौर आणि आता आमदार आहेत. सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज आहिरे, राहुल आहेर यांनी मनपात नगरसेवकपद भूषवले असून आता विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.
राजकीय वाटचाल
गावपातळीपासून संसदेपर्यंतचा राजकीय आलेख सरळ आणि सोपा नसतो. यामध्ये पक्षीय राजकारण, जातीय समीकरणे, नेतृत्वगुण, जनसंपर्क तसेच योग्य वेळी मिळालेली संधी या सर्व घटकांची महत्त्वाची भूमिका असते. नाशिक महानगराने यशस्वी राजकारणी घडवले आहेत. नाशिकचे राजकीय चित्र हे यश, अपयश, संधी आणि संघर्ष यांचे जिवंत प्रतिबिंब आहे आणि म्हणूनच ते नेहमीच राजकीय अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय राहिले आहे.




