नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mahapalika Election) भाजपने (BJP) १०० प्लसचा नारा देत १२२ पैकी ११८ (दोन जागांवर पुरस्कृतसह जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. महायुती होणार अशी हाक प्रथम महायुतीतर्फे देण्यात आली. मात्र, महायुती झालीच नाही. त्यामुळे भाजपसमोर शिक्सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तसेच महाविकास आघाडीन तगडे आव्हान उभे केले खरे. हे आव्हान उभे करताना मात्र शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला भाजपसमोर एकास एक उमेदवार (Candidate) देताना नाकीनऊ आले. एकास एक उमेदवारी देत असताना शिवसेना (उबाठा) व मनसेचेच पाच ठिकाणी उमेदवार समोरासमोर आहेत. तर सहा प्रभागांत ११ ठिकाणी शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचेही उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती (Shivsena UBT and MNS) झाली असली, तरी नाशिकमध्ये मात्र या युतीला तडा गेला आहे. युतीत मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना (उबाठा) ने थेट मनसेविरोधात उमेदवार उभे केल्याने मनसेची पाच प्रभागांतील पाच जागांवर कोंडी झाली आहे. भाजप-शिवसेना सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्यपातळीवर हातमिळवणी केली आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेत शिवसेना (उबाठा) ७९ तर मनसे ३३ जागा लढवणार असल्याचा निर्णय झाला होता. मात्र, युती झाल्यानतरही उबाठाकडून पाच प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांसमोर स्वतःचे उमेदवार देण्यात आले आहेत.
अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यामध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू होत्या. मात्र, त्याला यश न आल्याने अखेर या जागांवर ‘मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तरीही उबाठाच्या या खेळीमुळे मनसेचे निवडणुकीतील गणित बिघडल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित प्रभागांमध्ये मनसेला विजयासाठी अधिक जोर लावावा लागणार आहे. यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत युती असूनही अंतर्गत संघर्ष रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; ‘या’ प्रभागांमध्ये वातावरण टाईट
शिवसेना राष्ट्रवादी यांच्यातही लढती
भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी स्वतंत्र युती (Alliance) केली असली, तरी नाशिक महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तब्बल सहा प्रभागांतील ११ ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने उभे राहिल्याने युतीतील अंतर्गत विसंवाद उघड झाला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात ९२-३० असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेने अतिरिक्त जागांवर एबी फॉर्म दिल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीनेही ऐनवेळी आलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म देत शिवसेनेविरोधात रिंगणात उतरवले त्यामुळे राष्ट्रवादीचा आकडा ३० वरून ४१-४२ पर्यंत वाढला आणि एकूण सुमारे २० जागांवर तिढा निर्माण झाला.
अर्ज माघारीनंतर काही उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेर ११ ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. माघारीनंतर दोन दिवसांनी पक्षाकडून अधिकृत जाहीर झालेल्या यादीत नेमके किती उमेदवार मैदानात आहेत, याची स्पष्ट माहिती पक्षातील नेत्यांनाही नसल्याने गोंधळ अधिकच वाढत्याचे दिसून आले. आता निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असला, तरी शिवसेना व राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये समाधान नसल्याचे या गोंधळातून दिसून येत आहे. अपूर्ण पॅनल पूर्ण करण्यासाठी अपक्ष उमेदवारांना अधिकृत करण्याचे प्रयत्न सध्या दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याचेही चित्र आहे. यामुळे युती असूनही निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत संघर्ष चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’ रुपयांना; महापालिकेकडून उमेदवारांसाठी खर्चाचे दर निश्चित
मनसे-उबाठा उमेदवार आमनेसामने असलेले प्रभाग व त्यांचे उमेदवार
- प्रभाग ५ (ड) तेजस खांदवे (उबाठा) – नवनाथ जाधव (मनसे
- प्रभाग २३ (ड) प्रवीण जाधव (उबाठा) – स्वागता उपासनी (मनसे)
- प्रभाग २४ (ड) सीमा बडदे (उबाठा) – संदीप दोंदे (मनसे)
- प्रभाग २५ (ड) मुरलीधर भामरे (उबाठा) – राहुल पाटील (मनसे)
- प्रभाग २७ (क) हर्षदा सोनवणे (उबाठा)- श्रीताई कोदे (मनसे)
या प्रभागांत शिवसेना-राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत
- प्रभाग ११ (अ) योगेश गांगुर्डे (शिवसेना)-विजय अहिरे (राष्ट्रवादी) (ड) धीरज शेळके (शिवसेना) – जीवन रायते (राष्ट्रवादी)
- प्रभाग १३ (क) दीपक डोके (शिवसेना)- शेखर देवरे (राष्ट्रवादी)
- प्रभाग १४ (क) रूपाली डहाके (शिवसेना) – हश्मी अलफान (राष्ट्रवादी)
- प्रभाग १८ (अ) अशा पवार (शिवसेना) – रोहित गाडे (राष्ट्रवादी), (ब) रंजना बोराडे (शिवसेना) – वंदना बोराडे (राष्ट्रवादी) (ड) सुनील बोराडे (शिवसेना) – योगेश मिसाळ (राष्ट्रवादी)
- प्रभाग १९ (अ) विशाखा भडांगे (शिवसेना) – शीतल साळवे (राष्ट्रवादी) (ब) पंडित आवारे (शिवसेना) -सचिन आहेर (राष्ट्रवादी) (क) जयश्री खर्जुल (शिवसेना) – शोभा आवारे (राष्ट्रवादी)
- प्रभाग २४ (ड) सागर मोटकरी (शिवसेना)- अमर कमरे (राष्ट्रवादी)
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर




