नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौराची (Mayor and Deputy Mayor Election) निवड उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत केली जाणार आहे. भाजपने (BJP) १२२ पैकी तब्बल ७२ जागांवर विजय मिळाल्याने त्यांचीच सत्ता महापलिकेत असणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून हिमगौरी आहेर-आडके तर उपमहापौरपदासाठी माचीन्द्र सानप यांच्या नावाची घोषणा केली आहे. उद्या होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची कुठलीही फोडाफोडी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून आज (गुरुवारी) भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. अशातच महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या मनसेच्या एकमेव नगरसेवकाने शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : भाजप विरोधकांची बेरीज पन्नास तरीही महापौर पदाच्या रिंगणात; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
महापालिका निवडणूक मनसे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने (Shivsena and Congress) एकत्रित लढवली होती. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे १५, काँगेसचे तीन आणि मनसेचा एक नगरसेवक निवडून आला होता. यात प्रभाग क्रमांक ६ मधून मनसेच्या मयुरी अंकुश पवार या एकमेव महिला नगरसेवकपदी निवडून आल्या. मात्र, आता त्यांनी महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वीच शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर मनसेला सोबत घेतल्यामुळे शिंदेसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा मिळून स्थायी समितीवरील एक सदस्य वाढणार आहे. यामुळे महापालिकेतील स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक तसेच विविध समित्यांवरील राजकीय गणिते बदलणार असल्याचे बोलले जाते.
हे देखील वाचा : Nashik Mayor Election : भाजपला नगरसेवकांवर भरोसा नाय का? महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली विशेष खबरदारी
दरम्यान, उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर ठाकरेंच्या सेनेकडून सीमा पवार यांनी अर्ज भरला आहे. शिंदे सेनेचे अजय बोरस्ते यांनी महायुतीतील समन्वयाबाबत मुंबईत (Mumbai) वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी नाशिकमध्ये केली जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे जर यावर तोडगा निघाल्यास उपमहापौरपद शिंदे सेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. याबाबत आज (गुरुवारी) रात्री किंवा उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पंरतु, मनसेच्या एकमेव नगरसेवकाने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनसेकडून देण्यात आले स्पष्टीकरण
नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे पती व मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार यांनी ‘स्थानिक नेत्यांनी त्यांना दिलेल्या अधिकारातून हा निर्णय घेण्यात आल्याचे’ म्हटले आहे. त्यामुळे आता याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा स्थानिक नेते काय म्हणतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





