नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहराच्या स्थानिक प्रश्नांना संसदेच्या सभागृहात सातत्याने वाचा फोडणारे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेच्या (UNGA-81) निमित्ताने न्यूयॉर्क येथे झालेल्या विविध समित्यांच्या कामकाजात भारतीय संसदीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य म्हणून सहभाग नोंदवला. या दौऱ्यानंतर मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये परतलेल्या खासदार वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले.
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ सदस्यीय संसदीय प्रतिनिधीमंडळात निवड झालेले व महाराष्ट्रातून या प्रतिनिधीमंडळात समाविष्ट असलेले एकमेव खासदार म्हणून राजाभाऊ वाजे यांच्या सहभागाकडे नाशिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत न्यूयॉर्क येथे झालेल्या दौऱ्यात त्यांनी सामाजिक विकास, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संयुक्त राष्ट्रांच्या कार्यपद्धतीशी संबंधित विषयांच्या चर्चेत सहभाग घेतला.
संयुक्त राष्ट्रांच्या तृतीय समितीतील सामाजिक विकासविषयक चर्चेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी डिजिटल व आर्थिक समावेशन, अन्नसुरक्षा, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांचा आढावा घेतला. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणा, विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व आणि जागतिक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक प्रभावी करण्यासंबंधीच्या चर्चेत सहभाग नोंदवला.
नाशिक @ ३५.७,दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील उच्चांकी तापमान
नाशिक रोड स्थानकावर उत्साहपूर्ण स्वागत
न्यूयॉर्क येथील दौरा आटोपून नाशिकमध्ये परतलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. जागतिक व्यासपीठावरील संसदीय सहभागानंतर आपल्या मतदारसंघात परतलेल्या खासदारांच्या स्वागतामुळे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
लक्ष दुष्काळाकडे
नाशिकमध्ये झालेल्या स्वागतानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, “जागतिक व्यासपीठावर कामकाज करत असतानाही राज्यासह नाशिक जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या दुष्काळी परिस्थितीकडे होते. आता माझे प्राधान्य नाशिकच्या जनतेसमोरील पाणीटंचाईचे संभाव्य संकट आणि दुष्काळाच्या आव्हानाला असेल. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी, गावागावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा आदींसह आवश्यक उपाययोजनांचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे. संकट येण्याची वाट पाहण्यापेक्षा, त्याचा सामना करण्यासाठी आजच नियोजन करणे ही काळाची गरज आहे.




