Wednesday, October 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक @ ३५.७,दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील उच्चांकी तापमान

नाशिक @ ३५.७,दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील उच्चांकी तापमान

पहिल्याच पंधरवड्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा, दिवसा उन्हाचा चटका, रात्रीही उकाडा

नाशिक । प्रतिनिधी
शहरात यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. शुक्रवारी (दि. ९) शहराचे कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, आठ दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढेच आहे. दिवसभर उन्हाच्या झळा आणि मंदावलेल्या वाऱ्यांमुळे नाशिककर घामाघूम झाले आहेत.

शहरात दिवसा उन्हाचा चटका तीव्र झाला असतानाच रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसाबरोबरच रात्रीही उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

बुधवार (दि. ७) पासून कमाल तापमान ३५ अंशांच्या, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. आकाश निरभ्र असल्याने आणि वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.

शहर आणि परिसरातील हवामानात कमालीचा बदल झाला असून, आगामी आठवडाभर पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत हवामान पूर्णतः कोरडे राहण्याची आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या जाणवत असलेल्या उष्णतेपासून लवकर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

बाजारपेठांतील गर्दी ओसरली
वाढत्या तापमानाचा परिणाम शहरातील जनजीवनावरही होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असह्य होत असल्याने बाजारपेठांमधील गर्दी ओसरली आहे. शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ होत असून, काही भागांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

ऑक्टोबरमधील उच्चांकी कमाल तापमान (२०१६ ते २०२६)
तारीख कमाल तापमान
१४ ऑक्टोबर २०१६ ३२.२°
४ ऑक्टोबर २०१७ ३३.९°
२२ ऑक्टोबर २०१८ ३५.२°
५ ऑक्टोबर २०१९ ३१.९°
१० ऑक्टोबर २०२० ३३.२°
१६ ऑक्टोबर २०२१ ३३.५°
१९ ऑक्टोबर २०२२ ३०.९°
९ ऑक्टोबर २०२३ ३३.८°
२९ ऑक्टोबर २०२४ ३४.१°
१४ ऑक्टोबर २०२५ ३३.०°
९ ऑक्टोबर २०२६ ३५.७°

ताज्या बातम्या