Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार

नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार

मुंबई / नाशिक । प्रतिनिधी Mumbai / Nashik

नाशिक-मुंबई रस्त्यावर भिवंडी व ठाणे दरम्यान होणारी प्रचंड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.28) बैठक घेऊन संबंधितांना ही समस्या त्वरित सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत ठाणे जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे.आमदार सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी या समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेत शुक्रवारी बैठक घेतली व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्व शक्य ते उपाय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.अधिवेशनात हजर राहण्यासाठी नाशिकवरुन मुंबईला येताना आमदार सत्यजीत तांबे यांना देखील या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले होते. आ. तांबे भिवंडीवरुन कल्याण रेल्वे स्थानकात जावून तेथून ते मुंबईला उपनगरीय रेल्वेने रवाना झाले होते. त्यांनी या घटनेची माहिती देणारे ट्वीट केले होते व त्यांनी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रश्नी मुख्यमंत्री कार्यालयाने गांभीर्याने दखल घेतली व थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन केले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, रस्ते विकास मंत्री दादा भुसे, मनिषा म्हैसकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी, ठाण्याचे पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

नाशिक, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका व इतर संबंधित विभागांचा समावेश असलेले विशेष कृतीदल स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

नाशिक – मुंबई या मार्गावरील खड्डे दोन दिवसात बुजवा, या मार्गावरील अवजड वाहतूक काही काळासाठी बंद करावी, इतर अनुषंगिक उपाय योजावेत. ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी नियमितपणे या वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवावे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आज बैठक

विशेष कृतीदलाची पहिली बैठक शनिवारी (दि.29) सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत अधिक तपशीलवार उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आ. सत्यजित तांबे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या