नाशिक | प्रतिनिधी Nashik
मागील सुमारे चार वर्षापासून ज्याची सर्वजण वाट पाहत होते, त्याचा फैसला आज जाहीर होणार आहे. काल शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली.तर आज, शुक्रवारी (दि.१६) सकाळी १० वाजेपासून सुरू होणार्या मतमोजणीतून कोण ठरणार धुरंधर हे ठरणार आहे. साधारण १२ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोणाच्या हाती शहराचा कारभार जाणार, याचा फैसला मतमोजणीच्या पहिल्याच दोन तासांत होण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत बहुतेक प्रभागांतील कल स्पष्ट होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. मतमोजणीसाठी सुमारे ९ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांना पूर्वतयारी व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयातून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
असे आहे नियोजन
मतमोजणीसाठी शहरात ९ ठिकाणी एकूण १० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहे. प्रभागनिहाय २० ते २८ मतमोजणीच्या फेर्या अपेक्षित आहे. प्रभाग १५ व २० हे तीन सदस्य असल्याने त्यांचा निकाल पहिले लागण्याची शक्यता आहे. मतदान यंत्रांची सरमिसळ करुन टेबलावर येणार आहे. एक फेरी पूर्ण झाल्यावरच दुसरी फेरी सुरू होणार आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निरीक्षण, प्रवेश नियंत्रण तसेच वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रे
प्रभाग क्र. -मतमोजणीचे ठिकाण
१, २, ३ -मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी
४, ५, ६ -मीनाताई ठाकरे स्टेडियम, पंचवटी
७, १२, २४ -दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका
१३, १४, १५ -वंदे मातरम् सभागृह, डीजीपीनगर, नाशिक
१६, २३, ३० -अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, मुंबई नाका
१७, १८, १९ -शासकीय तंत्रानिकेतन, सामनगाव रोड, नाशिकरोड.
२०, २१, २२ -नाशिकरोड विभागीय कार्यालय, नाशिकरोड
२५, २६, २८ -प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलीस ठाणे मार्ग, नवीन नाशिक
२७, २९, ३१ -राजे संभाजी स्टेडियम, नवीन नाशिक
८, ९, १०, ११ -सातपूर क्लब हाउस, सातपूर




