Monday, October 5, 2026
HomeनाशिकNashik News: शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर, महासभेत नगसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी

Nashik News: शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर, महासभेत नगसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी

श्वान, सांडपाणी, साधुग्रामवरून प्रशासनाची कोंडी, महासभेत दैनंदिन समस्यांवर उपाययोजना करण्याची नगरसेवकांची मागणी

नाशिक | प्रतिनिधी
महासभेत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील आणि शिवसेनेचे अजय बोरस्ते यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून अजय बोरस्ते यांनीही या विषयावर भूमिका मांडावी, असे म्हणत पाटील यांनी बोरस्ते यांना लक्ष्य केले.

महासभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिनकर पाटील यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने किती निधी खर्च केला, आतापर्यंत किती खड्डे बुजविण्यात आले, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर किती कारवाई करण्यात आली, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी शहर अभियंता अग्रवाल यांच्यावर केली. आपल्या प्रभागातील एक खड्डा बुजविल्यानंतर काही वेळातच पुन्हा खराब झाल्याचे सांगत त्यांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून शहर अभियंत्यांच्या बदलीची मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

याच चर्चेदरम्यान पाटील यांनी अजय बोरस्ते यांच्यावर निशाणा साधत, खड्ड्यांच्या प्रश्नावर त्यांनीही बोलावे, गप्प बसू नये, असा टोला लगावला. पाटील यांच्या या वक्तव्यावर बोरस्ते यांनी तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात वैयक्तिक स्वरूपाचे मुद्दे आणू नयेत, असे सांगत त्यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले. कोणाच्या दालनात तासतास कोण बसते, याची आम्हाला माहिती आहे, असा टोला लगावत बोरस्ते यांनी पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद अधिकच वाढला.

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

श्वान, सांडपाणी, साधुग्रामच्या प्रश्नाने प्रशासनाची कोंडी
नाशिक महापालिकेच्या महासभेच्या सुरुवातीलाच शहरातील मूलभूत नागरी प्रश्नांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव, अनधिकृत गोठ्यांमधून वाहणारे मलमूत्र, सांडपाणी वाहिन्यांची अपुरी क्षमता, चेंबरवरील अतिक्रमणे, महापालिकेच्या मालमत्तांचे न्यायालयीन वाद आणि साधुग्रामसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा प्रलंबित मोबदला या मुद्द्यांवर सभागृहात जोरदार चर्चा झाली. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी मोकाट श्वान, अनधिकृत गोठे आणि सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. वडाळा गाव परिसरातील काही अनधिकृत गोठ्यांमधून निर्माण होणारे मलमूत्र थेट नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेसह पावसाळ्यात सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जुन्या वाहिन्यांची क्षमता वाढवून त्या बदलण्याची आवश्यकता असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

नगरसेवक शाहू खैरे यांनी शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. रस्त्यांवर आणि रहिवासी भागांमध्ये मोकाट श्वानांचे टोळके फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मसोडलेले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होत असून महापालिकेने यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेच्या सांडपाणी व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. विभागनिहाय दरवर्षी सुमारे १५ ते २० कोटी रुपये सांडपाणी व्यवस्थेसाठी खर्च होत असतानाही अनेक भागांमध्ये समस्या कायम असल्याचे त्यांनी सांगितले. चेंबर दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार खर्च करण्यापेक्षा जुन्या व जीर्ण व्यवस्थेचे कायमस्वरूपी नूतनीकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक अजिंक्य साने यांनी शहराच्या सांडपाणी व्यवस्थेचा सविस्तर विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची मागणी केली. शहराची वाढती लोकसंख्या, नव्याने विकसित होणारे भाग आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेऊन सांडपाणी वाहिन्यांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तात्पुरत्या दुरुस्तीवर भर न देता अनेक वर्षांचा विचार करून सांडपाणी व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील यांनी महापालिकेच्या मालकीच्या विविध मिळकतींचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. महापालिकेच्या मालमत्तांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची संख्या, त्यांची सद्यस्थिती आणि त्यावर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती सभागृहासमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. म हापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस धोरण आखावे आणि न्यायालयीन प्रकरणांचा प्रभावीपणे पाठपुरावा करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान, महासभेच्या सुरुवातीलाच नागरी प्रश्न उपस्थित झाल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. मोकाट श्वानांपासून सांडपाणी व्यवस्थेपर्यंत आणि महापालिकेच्या मालमत्तांपासून साधुग्रामच्या जमिनीच्या मोबदल्यापर्यंतच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ तात्पुरती कार्यवाही न करता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ताज्या बातम्या

Crime News : आई-वडिलांकडून मुलाचा खून, मृतदेह शेतात नेऊन जाळला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार न करता घरातच ठेवल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा...