नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नुकतेच नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी अॅक्शन मोडवर येऊन सलग दोन दिवस रामकुंड व परिसराची पाहणी केली तर मनपात सर्व खातेप्रमुखांच्या बैठका घेऊन कामला गती देण्याचे आदेश दिले.यापूर्वी शहर साफसफाईच्या सुमारे १७५ कोटींच्या ठेक्यासाठी एका रात्रीत निकष बदलून निविदा काढण्यात आली होती, त्याला देखील आता ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यासाठी नव्याने निविदा (Tender) प्रसिद्ध होणार असल्याचे समजते.
तत्कालीन आयुक्तांनी पावणे दोनशे कोटींच्या सफाई ठेक्यातील अटी शर्थीत रातोरात बदल केला होता. त्यावेळी एका सत्ताधारी नेत्याच्या जवळच्या ठेकेदाराला सफाईचे काम मिळावे, यासाठी खटाटोप झाल्याची चर्चा होती. दरम्यान आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असून त्या ठेक्यावर स्थानिक नेत्यांनी आक्षेप घेत या ठेक्याची निविदा प्रक्रियाच नव्याने राबवण्याची मागणी केली आहे. हा ठेका आता वादात सापडला असून याबाबतची माहिती घनकचरा विभागाकडून आयुक्तांना गुरुवारी (दि.१) सादर केली जाणार आहे.
महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षात नोकरभरती (Recruitment) झालेली नाही. त्यामुळे मागील काही वर्षापासून आउटसोर्सिगच्या माध्यमातून पालिकेची कामे केली जात आहेत. पूर्व व पश्चिम विभागातील साफ- सफाईची कामे आउटसोर्सिंगद्वारे केली जात आहे. चार वर्षापूर्वीवॉटरग्रेस कंपनीला सदर काम देण्यात आले होते. परंतु गेल्या वर्षी या संस्थेच्या कामाची मुदत संपुष्टात आली. निविदा प्रक्रिया राबवली जाणार होती, मात्र विविध निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात ठेका सापडत गेला. तर तत्पूर्वी महपालिकेला (NMC) पूर्णवेळ आयुक्तच नसल्याचे चित्र होते.
प्रभारींच्या हातून पालिकेचा कारभार पाहिला जात होता. यामुळे महापालिकेच्या कारभाला फटका बसला. सफाई ठेका पूर्ण होत नसल्याने विद्यमान ठेकेदारास चार वेळेस मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान या ठेक्याच्या अटीशर्थीत बदल केल्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्या ठेक्याचे काम विशिष्ट ठेकेदाराला मिळावे म्हणून रातोरात अटीशर्थी बदल्याचा धक्कादायक आरोप झाला. आता सादरीकरण झाल्यावर नवीन आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.