नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Brigade) लवकरच एक भव्य स्वरूपाची ३६ फुटी अत्याधुनिक शिडी मिळणार असून, त्यामुळे शहरातील उंच इमारतींमध्ये (Budling) लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यास आणि बचावकार्य करण्यास मदत होणार आहे. सदर शिडीचे (Shidi) काम सध्या फिनलैंड येथील कंपनीकडून अंतिम टप्प्यात सुरू असून, लवकरच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी फिनलँडला जाऊन त्या शिडीची पाहणी करणार आहेत. त्याची पाहणीनंतर काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून, पुढील दोन ते तीन महिन्यांत ही शिडी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
नाशिकमध्ये (Nashik) गेल्या काही वर्षात उंच इमारतींची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः उंच मजल्यांवरील आगीच्या घटनांमध्ये, बचावकार्य करताना अग्निशमन विभागास वेळोवेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने (NMC) एक अत्याधुनिक आणि उंचीपर्यंत पोहोचणारी शिडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ही शिडी केवळ उंचीपर्यंत पोहोचण्यास मदत करणार नाही, तर ती अगदी सुरक्षित, वेगवान आणि आधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज अशी आहे. फिनलँडमधील एका नामांकित कंपनीकडून ही शिडी तयार करण्यात येत आहे.
शिडीचे वैशिष्ट्य
३६ फुटांपर्यंत सहजतेने पोहोचणारी ही शिडी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स, सेफ्टी लॉक आणि अग्निशामक पाण्याच्या नोजल्सने सुसज्ज राहणार आहे. या शिडीच्या सहाय्याने अग्रिशामक जवान कमी वेळात, अधिक सुरक्षितपणे उंच मजल्यांवर पोहोचू शकतात आणि तत्काळ बचावकार्य सुरू करू शकतात. तसेच, ही शिडी जड उपकरणे, स्ट्रेचर, वायू सिलिंडर्स आणि इतर साहित्य नेण्यासाठी सक्षम आहे. या शिडीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
अग्निशमन विभाग अधिक सक्षम होणार
या शिडीमुळे महापालिकेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम व सज्ज होणार आहे. केवळ आग विझवण्यापुरते नव्हे, तर नागरिकांचे जीव वाचवणे हेही या नव्या यंत्रणेचे प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे.




