नाशिक | Nashik
जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांतील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन अपील तसेच उमेदवारी अर्ज भरताना मुदतींचे पालन न झाल्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सिन्नर नगरपरिषदेच्या (Sinnar Nagar Parishad) प्रभाग क्रमांक २, ४, ५ व १०, ओझर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ व ८ आणि चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ येथील निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या होत्या.
हे देखील वाचा : Nagar Parishad Election : जिल्ह्यात साडे नऊ वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; चांदवडला सर्वाधिक तर सिन्नर, ओझरला किती?
या प्रभागांसाठी स्वतंत्र व सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता . त्या कार्यक्रमानुसार आज (दि.२० डिसेंबर) रोजी मतदान (Voting) पार पडत असून, उद्या (दि.२१ डिसेंबर) रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या तिन्ही ठिकाणी ५.४६ टक्के मतदान झाले होते. तर साडे अकरा वाजेपर्यंत १७ टक्के आणि दुपारी दीड पर्यंत ३२.४० टक्के इतके मतदान झाले होते. यानंतर आता दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ४९.४७ टक्के इतके मतदान झाले आहे.
दरम्यान, या तिन्ही नगरपरिषदांच्या एकूण १७ हजार ८३६ मतदारांपैकी ८ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात ४ हजार ६३६ पुरुष आणि ४ हजार १९३ महिलांचा समावेश आहे. दुपारी साडे तीनपर्यंत चांदवडला ५४.४२ टक्के, ओझरला ४५.०६ टक्के आणि सिन्नरला ५०.५५ टक्के इतके मतदान (Voting) झाले आहे.





