Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNagar Parishad Election : जिल्ह्यात साडे नऊ वाजेपर्यंत 'इतके' टक्के मतदान; चांदवडला...

Nagar Parishad Election : जिल्ह्यात साडे नऊ वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; चांदवडला सर्वाधिक तर सिन्नर, ओझरला किती?

नाशिक | Nashik

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन अपील तसेच उमेदवारी अर्ज भरताना मुदतींचे पालन न झाल्याने नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सिन्नर नगरपरिषदेचे चार, ओझर नगरपरिषदेचे दोन तसेच चांदवड नगरपरिषदेचा एक प्रभाग समाविष्ट होता.

- Advertisement -

सिन्नर नगरपरिषदेच्या (Sinnar Nagar Parishad) प्रभाग क्रमांक २, ४, ५ व १०, ओझर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ व ८ आणि चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ येथील निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या होत्या. या प्रभागांसाठी स्वतंत्र व सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता . त्या कार्यक्रमानुसार आज (दि.२० डिसेंबर) रोजी मतदान (Voting) होणार असून, उद्या (दि.२१ डिसेंबर) रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) सकाळपासून सिन्नर, ओझर आणि चांदवड येथील प्रभागांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे.

YouTube video player

सिन्नर येथे सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत ५.६१ टक्के इतके मतदान झाले होते. येथील चार प्रभागांसाठी १२ मतदान केंद्र असून, एकूण १० हजार ८२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५७७३ पुरुष आणि ५ हजार ०३९ महिलांचा समावेश आहे. तर चांदवडला (Chandwad) दोन मतदान केंद्र असून, याठिकाणी ७.३० ते ९.३० या सुरुवातीच्या दोन तासांत ५.७८ टक्के मतदान झाले आहे. दोन प्रभागांसाठी एकूण २ हजार ६० मतदार मतदान करणार आहेत. यात १०३३ पुरुष आणि १०२७ महिला मतदार आहेत. तर ओझर येथे ५ मतदान केंद्र असून, याठिकाणी ७.३० ते ९.३० या सुरुवातीच्या दोन तासांत ५.०१ टक्के मतदान झाले आहे. येथे प्रभाग क्रमांक ३ साठी मतदान पार पडत असून, एकूण ४ हजार ९५५ मतदार आहेत. यामध्ये २५५० पुरुष आणि २४०५ महिला मतदारांचा समावेश आहे.

दरम्यान, सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ५.४६ टक्के मतदान झाले असून, एकूण १७ हजार ८३६ मतदारांपैकी ९७४ मतदारांनी मतदान केले होते. यात ५९८ पुरुष आणि ३७६ महिलांचा समावेश होता. यामुळे सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत हा मतदानाचा आकडा वाढणार असून, किती मतदार मतदानाचा हक्क बजावतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या