नाशिक | Nashik
शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri Festival) सुरुवात झाली असून, घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीची पूजा, आरती, गरबा असे भरगच्च कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. या काळात अनेक युवक- युवतींसह महिलावर्ग दांडिया आणि गरबा खेळतात. त्यामुळे मोठा जल्लोष व उत्साह या कालावधीत बघायला मिळतो.
सध्या याच दांडियाच्या (Dandiya) टिपऱ्या बनविण्याचा व्यवसाय नाशिकमधील (Nashik) सुनिता भिंगारे यांचे कुटुंब मागील ५०–६० वर्षांपासून करत आहे. आजही त्यांची ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालू आहे. दरवर्षी जून महिन्यापासून दांडिया तयार करण्याचे काम सुरू होते. प्रथम काठ्यांना पिवळा रंग लावून उन्हात वाळवल्या जातात. त्यानंतर टोकांना लाल रंग दिला जातो. तर दांडिया आकर्षक दिसण्यासाठी रंगीत ग्लिटर टेप्स लावल्या जातात किंवा मार्करने डिझाईन काढले जाते.
यावेळी सुनिता भिंगारे म्हणाल्या की, या व्यवसायातून फारसा नफा होत नसला तरी परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी मेहनत घेत असतो. दांडियाच्या तालावर होणाऱ्या उत्सवाचा जल्लोष लोकांना आनंद देतो. कमी नफा आणि कष्टाची कामे यामुळे तरुण पिढी वेगळ्या व्यवसायाकडे वळत आहे. मात्र आम्ही परंपरेचे रक्षण करण्याची धडपड कायम ठेवली आहे”, असे त्या सांगतात.
दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मशीनने तयार केलेल्या दांडिया उपलब्ध असल्या तरी हाताने केलेल्या सजावटीमुळे दांडियांना वेगळीच मागणी असते. सणासुदीच्या दिवसांत ग्राहक खास करून पारंपरिक हस्तकलेच्या दांडिया घेण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दांडियाना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली दिसत आहे.
दोन दांडियांची किंमत १५ रुपये
यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या दांड्या दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये लाकडी टिपऱ्यासह दांडियासह प्लॅस्टिकच्या, ॲल्युमिनियमच्या आणि एलईडी लाईट्स असलेल्या दांडियांचा देखील समावेश आहे. यातील लाकडाच्या दोन दांडियांची किंमत १५ रुपये इतकी आहे.
दांडिया बनवत असताना कधी नफा तर कधी तोटा होता. मात्र पोटापाण्यासाठी हे काम करावे लागते.अनेकदा उसणे पैसे घ्यावे लागतात. १० रुपये प्रति शेकडा (१०० काठ्या) या दराने कच्चा माल आम्ही विकत घेतो.
सुनिता भिंगारे, करागीर महिला
संकलन – कुंजल अहिरराव, पूजा जोंधळे, यशिका तेजवानी, खुशी कवडे




