नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात दरवर्षी ३२ हजार अपघातांची (Accident) नोंद होऊन त्यात १५ हजार जणांचा मृत्यू (Death) होतो. असे असतानाच, नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सर्वाधिक अपघात होऊन त्यात दरवर्षी सरासरी १४० हून अधिक मृत्यू होतात. आता नव्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै या साडेसहा महिन्यांत शहरात झालेले २६८ पैकी ९० अपघात राष्ट्रीय महामार्गांवर तर १५९ अपघात हे शहरांतर्गत उपरस्त्यांवर झाले आहेत. त्यामुळे ‘न्हाई’ सह महामार्ग, शहर व ग्रामीण पोलिसांनी सुरक्षात्मक उपाययोजनांवर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरी २२ लाख नवीन वाहनांची नोंद होते. तसेच, डिसेंबर २०२४ पर्यंत वाहन चालवण्याचा वैध परवानाधारकांची संख्या ४ कोटी २८ इतकी होती. त्यातच, अपघातांविषयी मंथन करता, नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वाधिक भीषण अपघात महामार्गावर (Highway) होत असल्याचे निरीक्षण आहे. दरम्यान, रात्री होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
त्यानुसार वाहतूक विभागाची पथके कार्यरत आहेत. विविध मार्गांवर व शाळेत जनजागृती केली जात आहे. राज्य महामार्गावर रात्री बारा ते चार या वेळेत ऑक्टोबरपर्यंत अवघा एक अपघात झाला आहे. रात्री आठ ते बारापर्यंत पाच अपघात झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग राज्य आणि शहराअंतर्गत रस्त्यांच्या तुलनेत शहरातील महामार्गावरील अपघात कमी आहेत. यानुसार शहरांतर्गत वाहतूक विभाग राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेसाठी नियोजन करीत आहेत. त्यांनी शहरांतर्गत रस्त्यांवरही सुरक्षेसंदर्भात ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.
आठ ते बारादरम्यान जास्त अपघात
पोलिसांच्या मोहिमेमुळे अपघात घटल्याच्या नोंदी असल्या तरी, रात्री आठ ते मध्यरात्री बारा ही वेळ अपघातास कारणीभूत व सर्वात घातकी असल्याचे समोर आले आहे. सन २०२५ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत शहरात २६८ अपघात झाले. रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत ७२ अपघात झाले आहेत. वर्दळ सर्वाधिक असते, तेव्हाच भरधाव वेग अथवा नियमबाह्य वाहतुकीमुळे रस्ते अपघात होत आहेत. रात्री आठ ते दहापर्यंत शहरासह महामार्गांवर बऱ्यापैकी वाहनांची संख्या अधिक असते, असे निरीक्षण व नोंदी समोर आल्या आहेत.
ठळक मुद्दे
शहरात मध्यरात्री ते पहाटेपर्यंत वर्दळ कमी आणि वेग जास्त असला तरी अपघातांचे प्रमाण कमी
दहा हजार वाहनांमागे घडतात सात अपघात.
राज्यात सुमारे ६ हजार ३०० ई-चलान मशिने कार्यरत
९६ इंटरसेप्टर वाहनेही महामार्गावर कार्यरत
राज्य महामार्ग अद्याप सुरक्षित
अपघातांच्या वेळा
रस्ते : रात्री १२ ते पहाटे ४ पहाटे ४ ते ८ सकाळी ८ ते १२-दुपारी १२ ते ४ – दुपारी ४ ते रात्री ८ – रात्री ८ ते १२
राष्ट्रीय महामार्ग : ५-७-११-१९-२८-२०
राज्य महामार्ग : १-२-३-३-५-५
इतर रस्ते : ८-७-२७-३५-३६-४७
एकूण : १४ – १६- ४१-५७-६८- ७२




