पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ (Simhastha Kumbh Mela) च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) सुरू असलेल्या विविध विकासकामांचा राज्याचे अप्पर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सखोल आढावा घेतला. विशेषतः भाविक आणि साधुसंतांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या रामकुंड परिसरातील कामांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. यावेळी महानगर आयुक्त मनिषा खत्री यांनी अप्पर मुख्य सचिवांना रामकुंड, तपोवन आणि परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांची सविस्तर माहिती दिली.
परिसरातील घाटांचे मजबुतीकरण, मलनिस्सारण व्यवस्था, शौचालये, वस्त्रांत्रगृहे, पाण्याची सोय, वाहतूक व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापन याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, रामकुंड पुरोहित संघाच्या प्रतिनिधींनीही अप्पर सचिवांना काही महत्त्वपूर्ण सूचना सादर केल्या. वस्त्रांत्रगृहाजवळ भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या छोट्या छत्र्यांऐवजी कायमस्वरूपी कॉरिडॉर उभारण्याची मागणी त्यांनी केली. भाविकांना (Devotees) सूर्य आणि पावसापासून संरक्षण मिळावे तसेच मोठ्या गर्दीच्या काळात शिस्तबद्ध हालचाल व्हावी, यासाठी या कॉरिडॉरची आवश्यकता असल्याचे पुरोहित संघाने स्पष्ट केले यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच,रामकुंडावरील जुना पूल न तोडण्याची आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्याची मागणीही संघाकडून करण्यात आली.
दरम्यान, धनुष्य कुंडावरील पूल ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्याने तो जतन करण्यात यावा,अशी मागणी पुरोहितांनी शासनाकडे (Government) केली. अप्पर मुख्य सचिवांनी या सर्व सूचना लक्षपूर्वक ऐकून घेत महानगरपालिका आणि संबंधित विभागांना भाविकांच्या सोयीचा विचार करून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी विभागीय स्वछता निरिक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक,राकेश साबळे, जमदाडे,गणेश तांबे आदी मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील पाहणीमुळे प्रशासनाने कामांचा वेग वाढविण्याचे संकेत दिले असून,भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




