सिन्नर | प्रतिनिधी
सिन्नर शहर-सरदवाडी-जामगाव-विंचूरदळवी या राज्य महामार्गाच्या उभारणी व उन्नतीसाठी नुकतीच केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सिन्नर ते विंचूरदळवी या मार्गाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून बिकट झाली होती. खड्डे, उंचवटे व अपुर्या रुंदीतून नागरिकांना, शेतकर्यांना व कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि मालवाहतुकीतील विलंब यामुळे या मार्गाच्या उन्नतीकरणाची मागणी सातत्याने होत होती.
याबाबत खा. वाजे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सिन्नर व आसपासच्या भागातील रस्त्यांच्या उन्नतीची गरज अधोरेखित करत सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नानंतर या रस्त्यासाठी ना. गडकरी यांच्याकडून २० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यातील औद्योगिक व कृषी विकासाला या रस्त्यामुळे दीर्घकालीन लाभ मिळणार असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल ऐतिहासिक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
स्थानिकांनी अनेक वर्षांपासून या मार्गाच्या नुतनीकरणासाठी सातत्याने मागणी केली होती. आता मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रकल्प जलदगतीने पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण कनेक्टिव्हिटी वाढणार
या निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, सुरक्षा उपाययोजना, साईनेज आणि वाहतूक व्यवस्थापनाची कामे होणार आहेत. रस्ता उभारणीनंतर सिन्नर औद्योगिक पट्टा आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, मालवाहतूक वेगवान व सुरक्षित होईल, जामगाव, सरदवाडी, विंचूरदळवी परिसरातील व्यापारी व्यवहारांना नवी चालना मिळेल, शेतकरी व कामगारवर्गाचा प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकार आणि ना. नितीन गडकरी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रकल्प शक्य झाला आहे. मतदारसंघातील रस्ते, पाणी, उद्योग व शेतीविषयक विकासकामांसाठी पुढेही मी तेवढ्याच तत्परतेने कार्यरत राहणार आहे. – खासदार राजाभाऊ वाजे
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




