Sunday, January 25, 2026
HomeनाशिकNashik News : सिंहस्थ मेळा कालावधीत बँकांनी विना व्यत्यय सेवा पुरवावी - प्राधिकरण...

Nashik News : सिंहस्थ मेळा कालावधीत बँकांनी विना व्यत्यय सेवा पुरवावी – प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह

नाशिक | Nashik

नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये सिंहस्थ होत आहे. या कालावधीत नाशिक, त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. या भाविकांना बँकांनी विना व्यत्यय सेवा पुरवावी. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात, असे निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

- Advertisement -

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ मेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून भाविकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना विविध विभागांच्या माध्यमातून सुरूवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे राजेश देशमुख, प्रतिक पाटील, बँक ऑफ बडोदाचे मयंककुमार, राजेंद्र राऊत, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रभातकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रितेश निकम, येस बँकेचे प्रसाद रॉय यांचेसह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player

यावेळी आयुक्त सिंह यांनी सांगितले की, सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल कुंभाला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे साधू-महंत, भाविकांना दर्जेदाररित्या आर्थिक सेवा पुरवाव्यात. त्यासाठी बँकिंग सुविधांचे बळकटीकरण करावे. ठिकठिकाणी एटीएम मशीन कार्यान्वित करतानाच त्यांच्यात रोकड राहील याचीही दक्षता घेण्यात यावी. साधूग्राम, गोदावरी घाट, त्र्यंबकेश्वर, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, पार्किंगच्या ठिकाणी प्राधान्याने बँकिंग सुविधा उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. बँकिंग सेवा सलग सुरू राहील याची दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत. विक्रेते, स्वयंसेवी संस्था, वाहतूक, पार्किंगसाठी क्यूआर-आधारित यूपीआय टर्मिनल कार्यान्वित करावे. असे सिंह म्हणाले.

तसेच कमी नेटवर्क असलेल्या पॉकेट्ससाठी यूपीआय लाइट आणि फीचर-फोन पेमेंटचा वापर करण्यात यावा. आर्थिक साक्षरता, डिजिटल याविषयी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. भाविकांना मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेत बँकिंग सुविधांची माहिती देण्यात यावी. अमृत स्नान, पर्वणी कालावधीत दैनंदिन रोख रकमेचा अंदाज घेऊन नियोजन करावे, कोशागार, पोलिस आणि बँकांनी समन्वयासाठी कक्ष कार्यान्वित करावा. बँकांनी सामाजिक दायीत्व निधीच्या माध्यमातून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पावसापासून बचावासाठी उपाययोजना, सावलीसाठी उपाययोजना, फिरते स्वच्छतागृह, मार्गदर्शक फलक, आपत्कालिन चिन्हे कार्यान्वित करावीत, त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्याची प्रक्रिया बँकांनी आतापासूनच सुरू करावीत. प्रत्येक बँकेने कुंभमेळ्यात समन्वयक अधिकारी नियुक्त करावेत, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...