नाशिक | Nashik
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या (Nashik) आदिवासी आयुक्तालयासमोर बिऱ्हाड संघर्ष आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. आदिवासी आश्रमशाळेत काम करणाऱ्या तासिका शिक्षकांसह रोजंदारी कर्मचार्यांना कायमस्वरूपी करा, तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता हे आंदोलक राजकीय पाठबळ मिळविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या नेतृत्वाखाली ५० आंदोलनकत्यांचे शिष्टमंडळ आज गुरुवारी (दि.१७) मुंबईत (Mumbai) राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी राज ठाकरेंना आंदोलनाची (Protest) सविस्तर माहिती देत भरतीप्रक्रियेवर तोडगा निघावा, यासाठी हस्तक्षेपाची करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आंदोलकांना दिलासा मिळतो का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) माजी आमदार जे.पी. गावित, कामगार नेते डॉ. डी.एल कराड यांनी नाशिक येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलनाची माहिती घेतली होती. यावेळी गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. तर मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार यांनी देखील दोन दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास नकार दिला होता. त्यानंतर आज हे आंदोलक मुंबईत राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात
बिऱ्हाड मोर्चातील आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून आदिवासी आयुक्तालयासमोर (Tribal Commissionerate) पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात १२ तास पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासकीय यंत्रणेला अधिक प्रमाणावर तणावाचा सामना करावा लागत आहे.




