नाशिक | Nashik
भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) सार्वत्रिक निवडणुकीसाठी पश्चीम विधान सभा मतदार संघातील ११ प्रभागांमधून तब्बल अडीचशे जणांनी मुलाखती देऊन निवड समितीसमोर आव्हान उभे केले आहे. उमेदवारी न मिळल्यास कोणती भूमिका घ्याल? या प्रश्नाला एका निष्ठावान कार्यकत्त्याने चक्क ते आताच तुम्हाला कशाला सांगू? असे उत्तर देऊन भविष्यातील संभाव्य राजकीय यादवीची जाणीव करुन दिली.
महापालिका निवडणुकीतील (Election) उमेदवार निवड प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणून १७डिसेंबरपर्यंत सर्व प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. एकूण १२२ प्रभागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पक्ष संघटनात्मक मजबुतीसाठी ही मुलाखत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. काल पश्चिम विधानसभा मतदार संघातील ८,९,१०,११,२४,२५ ,२६,२७,२८,,२९,३१ या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती आ, सीमा हिरे, राहुल ढिकले, विजय साने, लक्ष्मण सावजी, सुनील केदार यांनी घेतल्या. कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करण्यास मनाई असल्याने मोठ्या प्रमाणावर कोणीही समर्थक आणले नाही.
मुलाखतीसाठी (Interview) आवश्यक कागदपत्रे आणि भरलेली प्रश्नावली घेऊन येत होते. काही नवखे तर ऐनवेळी नमो अॅप डाऊनलोड करुन सभासद कसे व्हावे? बाचे मार्गदर्शन घेत होते. कुटुंबातील एक दोन सदस्य इच्छुक असलेले तर पत्नीला तरी द्या, नाही तर मला तरी उमेदवारी या अशी मागणी करत होते. काल मुलाखत देणाऱ्याऱ्यांमध्ये माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सुधाकर बडगुजर, आ. सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी बेंडाळे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी तसेच इतर पक्षातून नुकत्याच प्रवेश केलेल्यांनी मुलाखती दिल्या.
मी काही कोकाटे नाही….
काल मुलाखतीसाठी एक माजी नगरसेवक आले होते. गेल्या ५० वर्षापासुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले मात्र पहिल्यांदाच पक्ष बदलुन भाजपत आलेले असल्याने त्यांनीही मुलखत दिली. त्यांनाही पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास काय कराल असा प्रश्न विचारला होता. कागदोपत्री चुका नको म्हणून त्यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करेल. असे उत्तर लेखी दिले. मात्र, प्रत्यक्षात बोलताना मात्र मी काही माणिकराव कोकाटे यांच्यासारखा प्रत्येक विधान सभा निवडणुकीत पक्ष बदलुन निवडुन येत नाही, असे उत्तर दिले. त्यांच्या त्या मिश्कील उत्तराने मुलाखत घेणाऱ्यांचीही चांगलीच करमणूक झाली.
प्रोसेसने चालावे लागते
भाजपच्या मुलाखतीसाठी झालेली गर्दी व मॅरेथॉन मुलाखती पाहता एक ज्येष्ठ माजी नगरसेवकाला तुमचीही मुलाखत ? असे एकाने प्रश्नार्थक विचारले असता. त्यांनी प्रोसेस आहे. त्याप्रमाणे चालावे लागते. नाही तरी ठरलेले असते. असे उत्तर देऊन मुलाखती मागचे राजकारणाची जाणिव करुन दिली.




