नाशिक | प्रतिनिधी
गुरुवारी भर पावसात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी द्वारका भागात पाहणी करून मनपा आयुक्त मनिषा खत्री व पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांना येथील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी उपयोजना करण्याचे आदेश दिले. तसेच भुयारी मार्गाचा नागरिकांसाठी उपयोग व्हावा, यासाठी नियोजन करण्याची सूचना केली.
मागच्या शनिवारी मंत्री छगन भुजबळांनी द्वारका भागात पाहणी करुन मनपा व पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करून द्वारका चौक मोकळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने रविवारपासून या संपूर्ण परिसरात विशेष अतिक्रमण मोहीम सुरू केली. तर गुरुवारी मंत्री महाजन यांनी पाहणी केली. यावेळी मध्य नाशिकच्या भाजप आ. देवयानी फरांदे यांनी ना. महाजन यांना समस्या सांगून त्यावर उपाय करण्याची मागणी केली. येथील भुयारी मार्ग तयार केल्यापासून बंद पडला आहे. काही दिवस तो सुरू होता, मात्र त्याचा ताबा टवाळखोरांनी घेतला होता, तर नागरिकांकडून त्याचा वापर होत नव्हता. म्हणून ते बंद करण्यात आला आहे.
दरम्यान महाजन यांनी यावेळी त्याचा वापर नागरिकांसाठी व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मंत्री महाजन यांनी द्वारका भागातील वाहतुकीच्या अडचणींवर भर पावसात उतरून पाहणी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





