नाशिक : कालच भावाची सुट्टी संपली, अनेकांना त्यानी आणखी दोन दिवस थांबावे असे वाटत असूनही त्याला कर्तव्यावर जावे लागले. तो निघण्याआधी आईने ओवाळायला ताट केलं. पिठाचा दिवा केला. ताटामध्ये नारळ, रुपया, मंगळसूत्र, अक्षदा वैगरे अगदी सगळं काही होतं.
दिवा पेटवला आणि क्षणातच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. भाऊ पाटावर बसला. एक – एक करून सगळ्यांनी त्याला ओवाळलं. ‘ इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो ‘ असं म्हणत प्रत्येकाचं ओवाळून झालं. ओवाळत असताना एक गोष्ट लक्षात आली की ताटात दिवा किती महत्वाचा असतो ना ताटात?
पेटलेल्या दिव्यात एक तेज असते. तो प्रकाश असतो. नुसता प्रकाश नाही तर तर आनंदाने फुललेला प्रकाश असतो. कारण त्याचा अंधारावर विजय झालेला असतो. दिसत जरी नसला तरी एक गंध असतो त्यात. आणि आपल्याला सतत ध्येयाची जाणीव तो करून देत असतो.
सतत काहीतरी सांगत असतो. पुढे जायला प्रेरणा देत असतो. खूप परिश्रम करून तुलाही असंच कायम पेटत राहायचं आहे, स्वतःखाली अंधार असला तरी चालेल पण मात्र जगाला उजेड द्यायचा आहे.
वाटी मधली साखरपण एव्हडी गोड नसते जेवढा पेटलेला दिवा डौलात उभा असतो. त्यात कोणताही गर्व नसतो, अहंकार नसतो तर केलेल्या कर्माचा अभिमान असतो.
एका तेजाने ओवाळताना फक्त्त ‘इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो ‘ एवढच म्हणणं बरोबर नाही. मागून मागून काय मागितलं तर म्हणे बळीचं राज्य. आत्मसन्मानाने जगायला लावणाऱ्या दिव्या समोर पण आपलं ‘मागणं’ असतं. ह्या दिव्यासारखा जीवनात उजेड येवो, तेज येवो, जीवनातील तिमिर हटावा असं का नाही म्हणत आपण?
ओवाळत असताना दिवा विझू नये म्हणून किती प्रयत्न करतो आपण. पेटलेला दिवा विझला तर काहीतरी अपशकुन होईल अशी भीती आपल्याला वाटत असते. परंतु आपण हाती घेतलेले कार्य पूर्ण झाले काय आणि मध्येच सोडले काय? याचं काहीच वाटत नाही आपल्याला. असं का? याचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे.
ज्या दिवशी याचा नीट विचार करून काही सकारात्मक बदल आपल्यात स्वतःलाच जाणवेल तर तेव्हा आपण प्रगती पथावर आहोत असं समजायला काही हरकत नाहीये.
सूर्याचे प्रतिनिधित्व करणारा दिसायला छोटा पण अस्तित्व खूप मोठं असणारा दिवा कर्मरूपी ध्येयापर्यंत घेऊन जायला मदत करणारा असाच सतत तेवत राहो. दिवा ज्याप्रमाणे आत असणाऱ्या तेलाला कधी विसरत नाही, त्याप्रमाणे आई – वडीलांचे कष्ट आपल्याला सतत लक्षात राहो हीच प्रार्थना.
तू पेटला आहेस,
असाच कायम राहूदे
तुला जळताना,
मला डोळे भरून पाहू दे…
असं समजू नकोस
की,
मी शांत आहे,
ध्येय माझे निश्चित आहे,
तिथपर्यंत मी पोहचणार आहे,
मी ही आता पेटणार आहे,
थोडया वाऱ्याने पण
विझणार नाही,
पुढे सतत जाणार आहे,
तुला समोर ठेवणार आहे,
पुढे जाता जाता,
तुला सतत बघणार आहे,
फक्त्त आता तू,
पेटला आहेस,
असाच कायम राहूदे,
तुला जळताना,
मला डोळे भरून पाहू दे…
– माधुरी रोहम