नाशिक | Nashik
शिवसेनेचे (Shivsena) पळसे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी (वय ५०) यांचा मृतदेह (Dead Body) पळसे गावालगत असलेल्या नाल्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौधरी हे गुरुवार (दि.११ डिसेंबर) पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. यानंतर त्यांचा मृतदेह एका नाल्यात सापडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास चौधरी हे गुरुवार (दि.११) रोजी पहाटे पळसे येथील आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने नातेवाईकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. यानंतर आज (दि.१८) रोजी पळसे गावातील राजवाडा परिसरालगत असलेल्या नाल्यात एका महिलेच्या निदर्शनास एका इसमाचा मृतदेह पडलेला आढळून आला.
या महिलेने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना (Police) माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता सदर मृतदेह हा माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे पळसे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.तसेच प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, चौधरी यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पळसे गटातून २००७ साली त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक (Election) लढवली होती. या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी (Won) झाले होते. चौधरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.





