पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ (Mahasrul) येथील वक्रतुंड ट्रेडर्स परिसरात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची (Dead Body) ओळख पटली असून, मृत व्यक्तीचे नाव उमेश सुरेश अराळे (वय ३८ रा. पुणे) असे आहे. उमेश अराळे हा सासुरवाडीला बायकोला भेटण्यासाठी नाशिकला आला होता. मृतदेहाच्या शेजारी कपड्यांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. पोलिसांनी या बॅगमधील साहित्याची तपासणी करून मृत व्यक्तीची ओळख पटवली.
घटनास्थळी म्हसरूळ पोलिस ठाण्याचे (Mahsrul Police Station) अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाले. उमेश अराळे पुण्यात राहत होता, मात्र, त्याचे सासर नाशिकमध्ये असल्याने तो येथे वारंवार येत असे. घटनेच्या दिवशीही तो पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील तपास सुरू केला जाईल, अशी माहिती म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, म्हसरूळ परिसरात अलीकडेच घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिस ठाण्याकडे (Police Station) परिसरात पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना कार्यवाही करण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांकडून समजते. या घटनेने पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासणी पुढील काही दिवसांत वेगाने सुरु होण्याची शक्यता असून, मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.