पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
काल शुक्रवारी (दि.२० जून) रात्री सुमारास आडगाव शिवारातील (Aadgaon Area) कोणार्क नगरजवळील डी मार्टसमोर उड्डाणपुलावर एक भीषण अपघात (Accident) घडला. ओझरहून नाशिककडे (Ozer to Nashik) येणारी आय-ट्वेंटी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून धडकली. या अपघातानंतर कारने त्वरित पेट घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीबाहेर पडत जीव वाचवला.
अपघातग्रस्त कार सीएनजी असल्याने आगीने (Fire) वेगाने रौद्ररूप धारण केले. कारमधून मोठ्या आवाजाने झालेल्या धडकेत घाबरून चालक आयुष जहार (रा. नाशिक) कारमधून तत्काळ बाहेर पडला. कार क्रमांक (MH15 CT 0490) ही थेट उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक (MH15 FV 3862) वर धडकली. कंटेनर रस्त्यावर बिघाड झाल्याने उभा होता, अशी माहिती मिळाली आहे.
तर, घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या क.का. वाघ उपकेंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एका पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनधारकांसाठी ही एक धोक्याची सूचना ठरावी. महामार्गावर (Highway) नादुरुस्त वाहने उभे ठेवण्याची अनियमितता आणि त्यावर कोणतीही सूचक व्यवस्था नसणे हे अपघातास कारणीभूत ठरले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन एम. जी. काळे, व्ही. जी. चव्हाणके, ज्ञानेश्वर पाटील, महाले, ठोंबरे, शिंदे, भागवत आदी जवानांनी (Soldier) शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले.




