नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सरन्यायाधीशपदी शपथ घेतल्यानंतर न्या. भूषण गवई (Bhushan Gavai) प्रथमच नाशिकमध्ये (Nashik) येणार आहेत. यावेळी ते शनिवारी (दि. २७) कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयास भेट देणार आहेत. भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याने सुरु असलेल्या अमृत महोत्सवनिमित्त आयोजित ‘संविधान संहिता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असणारे न्या. गवई जिल्हा न्यायालयाच्या उद्घाटनानंतर ठाकूर महाविद्यालयात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, नाशिकचे पालक न्यायाधीश सारंग कोतवाल आणि अश्विन भोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. सरन्यायाधीश महाविद्यालयास भेट देणार असल्यासह इतर आवश्यक उपक्रमांची माहिती लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. ए. काद्री, उपप्राचार्य डॉ. एस. के. मांडवकर व प्रा. मेधा सायखेडकर यांनी बुधवारी (दि. २४) दिली.
काद्री यांनी सांगितले की, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ए.बी.टी. लॉ कॉलेजची स्थापना १९६९ मध्ये करण्यात आली. त्यानंतर कॉलेजच्या इतिहासात प्रथमच भारताचे सरन्यायाधीश कॉलेजला भेट देत असल्याने कॉलेजसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. लॉ कॉलेजमध्ये पीएचडीचे सेंटर सुरू होत असल्याने पीएचडी विभागाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येईल. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. याप्रसंगी संविधान उद्दिशिके च्या कोनशिलेचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे समन्वयक डॉ. बी. जी. कौरानी व डॉ. एस. के. मांडावकर आहेत.
संविधान उद्देशिका फलक अनावरण
देशाच्या न्यायव्यवस्थेत १४० न्यायाधीश आणि सुमारे १० हजार विधिज्ज्ञ देणाऱ्या नाशिकमधील न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात शनिवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई भेट देतील. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाविद्यालयात संविधानातील उद्देशिका फलकाचे अनावरण न्या. गवई यांच्या हस्ते होईल. यानंतर दुपारी कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये संविधान संहिता याबाबत न्या. गवई मार्गदर्शन करतील.




