नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील वाढते प्रदूषण आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर महानगरपालिकेच्या (NMC) दुर्लक्षाचा जाहीर निषेध करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे (Rahul Dive) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.१२) धडक धरणे आंदोलन आणि सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
नंदिनी (नासर्डी) गोदावरी संगम पुलाखाली, टाकळी गाव येथे आयोजित या आंदोलनाला शेकडो नागरिक, महिला, लहान मुले आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी सुमारे ४०० ते ५०० नागरिक एकत्र जमले असून, ‘नासर्डीला वाचवा, भ्रष्टाचाराला लावू कासा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलनादरम्यान राहुल दिवे यांनी मनपा प्रशासनावर थेट मलनिस्सारण केंद्राच्या ठेक्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. हा ठेका सुमारे १४०० कोटींचा आहे, ज्यात ठेकेदाराला २५ वर्षांसाठी प्रतिवर्ष १५० कोटी रुपये देण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाचे धोरण हे ठेकेदारांना सिंहस्थ कुंभमेळा नावाखाली जास्तीत जास्त मलिदा मिळवून देणे आणि त्यांचे पोट भरणे आहे. यामुळे शहराच्या पर्यावरणीय संकटाकडे दुर्लक्ष होत आहे, असे दिवे यांनी सांगितले.
नदीपात्रात थेट मलनिस्सारण सुरू असल्याने नासर्डी आणि गोदावरी नद्यांचे पावित्र्य धोक्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आंदोलकांनी मलनिस्सारण विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि पर्यावरण विभागाचा जाहीर निषेध करताना म्हटले की, शहरातील गटाराचे पाणी थेट नदीत मिसळले जाण्यामुळे प्रदूषण वाढेल आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. “आज जे गटाराचे पाणी नदीकाठावर दिसतेय, ते काही महिन्यांत नदीत मिसळून तिला पूर्णपणे दूषित करेल. पवित्र नद्यांचा श्वासच थांबेल,” असे राहुल दिवे यांनी बोलताना सांगितले. मी याआधी अनेक लेखी निवेदने देऊन प्रश्न उपस्थित केले, पण प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता गांधीगिरी मार्गाने अहिंसक पण ठाम जनआंदोलन उभारत आहोत. जोपर्यंत संबंधित विभाग जागे होत नाहीत आणि हे काम बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल, असेही दिवे यांनी स्पष्ट केले.
यावेळी महानगरपालिका अधीक्षक अभियंता जितेंद्र पाटोळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावर सुमारे ४०० ते ५०० नागरिकांच्या सह्या असून, तत्काळ कारवाई न झाल्यास अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नासर्डी नदीचे पावित्र्य राखूया, मलनिस्सारणाच्या दुर्लक्षाविरोधात आवाज उठवूया” हे घोषवाक्य आंदोलकांनी दिले. जनजागृतीसाठी सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली असून, पुढील दिवसांत ती वेग घेईल, असे दिवे यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी माजी नगरसेविका आशा तडवी, पूजा नवले, प्रवीण नवले, अनिल जोंधळे, पवन धांड, रपापा सय्यद, रफिक तडवी, दिलीप प्रधान, अनंत मोजड, बाबा पवार, गौरव केदारे, तुषार सोनकांबळे, मनीष डांगे, प्रवीण पाटील, अक्षय कटारे, जयंत मैसधुणे, वामन पगारे, संतोष तेलोरे, अमेय भालेराव, सनी शिंदे, हिरामण शिंदे, राजू धनगर, बाबा लोखंडे, गणेश शिंदे, संदीप अहिरे, निखिल गांगुर्डे, सचिन खैरनार, लखन पगारे, चिंटू गांगुर्डे, अजय दिवे आदी उपस्थित होते





