नाशिक | Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (गुरुवारी) नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik City) सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन झाले. यानंतर दोघेही वाहनांनी थेट रामकुंडावर आले.
त्यानंतर याठिकाणी त्यांनी सुरुवातील रामकाल पथाची पाहणी केली. यावेळी महापलिका आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना रामकाल पथाबाबत माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीवत पूजा करून सिंहस्थ विकासकामांचे भूमीपूजन केले. रामकुंड परिसरात सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, तसेच सिंहस्थपूर्व नियोजनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे काम सुरू असून, या प्रकल्पांच्या भूमीपूजनामुळे परिसरातील धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
दरम्यान, यावेळी सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सिंहस्थ प्राधिकरण आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एनएमआरडीचे आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.




